कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 07:33 AM2021-01-05T07:33:36+5:302021-01-05T07:34:23+5:30
Rohit Pawar : रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या.
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पहाटे चार वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असे महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबाबत रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार यांनी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. मात्र, राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन रोहित पवार यांनी दिले आहे.
याशिवाय, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत भाजपची भूमिका हुकूमशाहीची असल्याचे रोहित पवार म्हणाले. तसेच, महाराष्ट्रातील काही नेत्यांच्या होत असलेल्या ईडी चौकशीबद्दल रोहित पवार म्हणाले की, "उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे."
शेतकरी आणि सरकारमधील चर्चेची आठवी फेरी निष्फळ
शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरली. सोमवारी चार तास चाललेल्या या बैठकीत केंद्राने तीनही कायदे रद्द करावेत, हा आग्रह शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी कायम ठेवला. तसेच किमान हमीभावाच्या (एमएसपी) मुद्द्यावरही चर्चा झाली. कृषी कायदे रद्द न करण्याच्या निर्णयावर मंत्रिगट ठाम राहिला. दोन्हीकडच्या सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमून या संदर्भात सन्माननीय तोडगा काढला जावा, असा पर्याय मंत्रिगटाने सुचविला. मात्र, शेतकरी संघटनांनी तो धुडकावून लावला. चार तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता ८ जानेवारीला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरले आहे.