महासभेत गाजला मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:48 PM2019-11-20T23:48:58+5:302019-11-20T23:49:01+5:30

कुत्र्याच्या निर्बीजीकरणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्या; नगरसेवकांची मागणी

The topic of the Haidosa of Mokat dogs was heard in the General Assembly | महासभेत गाजला मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाचा विषय

महासभेत गाजला मोकाट कुत्र्यांच्या हैदोसाचा विषय

Next

पनवेल : महिनाभरात पनवेल पालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांनी २५ हून अनेकांना चावा घेतला आहे. निर्बीजीकरण बंद असल्याने कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. बुधवारी पनवेल महापालिकेच्या महासभेत भटक्या कुत्र्यांच्या विषयांचे पडसाद उमटले. या वेळी नगरसेवकांनी कुत्र्याच्या निर्बीजीकरणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली.

राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी लक्षवेधी उपस्थित करीत लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती सभागृहात केली. घरातून बाहेर पडल्यावर प्रत्येक जण कुत्र्यांचा विषय आमच्यासमोर मांडतो. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घेण्याचे त्यांनी सुचवले.

सहा महिन्यांत पनवेल पालिका क्षेत्रात १,२६६ जणांना श्वानदंश झाले आहे. काही संस्थांकडून पशूपक्ष्यांना खाद्य टाकण्यासाठी ठरावीक व्यक्तींना मानधन देण्यात येत असल्याचे नगरसेवक गुरुनाथ गायकर यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी मोबाइल टॉवर्सच्या कारवाईचा तपशील मिळण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी पालिका क्षेत्रातील अनधिकृत मोबाइल टॉवर्स विरोधात पालिकेने कारवाई तीव्र केली असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले.

विनापरवाना ९३ मोबाइल टॉवर पालिकेने सील केले आहेत. पालिका क्षेत्रात एकूण ३६३ अनधिकृत मोबाइल टॉवर्स आहेत. मात्र, काही मोबाइल टॉवर्स कंपन्यांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने त्यांनी या वेळी सांगितले.

पनवेल शहरातील अपूर्णावस्थेतील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आॅक्टोबर महिन्यात भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचे अपघाती निधन झाले. संबंधित रस्त्याचे काम अपूर्ण ठेवल्याने नगरसेविकेला आपला जीव गमवावा लागला. सुमारे दीड महिना होत आला तरी अद्याप याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याने याबाबत नगरसेवक हरेश केणी यांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी संबंधित बिटकॉन कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केली.

प्रभाग समित्यांच्या सभापती व अधिकाऱ्यांच्या कामावर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या वेळी दिवंगत नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी नगरसेविका अ‍ॅडव्होकेट नरेश ठाकूर तर महिला बाल कल्याण
समितीच्या सदस्यपदी नगरसेविका दर्शन भोईर यांची निवड करण्यात आली.

मुख्यालयाचे नाव ‘स्वराज्य’
पालिका मुख्यालय तसेच प्रभाग कार्यालयांना ऐतिहासिक किल्ल्यांची नावे देण्याची संकल्पना आयुक्त गणेश देशमुख यांनी राबविली आहे. राज्यात अशाप्रकारची संकल्पना राबविणारी पनवेल ही पहिलीच महापालिका आहे. या विषयाला सभागृहात मंजुरी मिळाली. या अंतर्गत पनवेल महापालिकेच्या नूतन मुख्यालयाला स्वराज्य, महापौर निवासाला शिवनेरी, आयुक्त निवासाला राजगड व प्रभाग अ,ब,क,ड या कार्यालयांना विजयदुर्ग, जलदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग अशी नावे देण्यात आली आहेत.

सीडीपीला मंजुरी
पनवेल महापालिकेचा सीडीपी पालिकेने तयार केला आहे. शहराचे व्हिजन डॉक्युमेंट यामध्ये असणार आहे. या सिटी डेव्हलपमेंट प्लॅनलाही महासभेत मंजुरी मिळाली.

जैवविविधता व्यवस्थापन समिती
महापालिका हद्दीतील जैवविविधता व्यवस्थापन समिती गठित करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. महापौर या समितीचे अध्यक्ष असणार असून या समितीद्वारे पालिका क्षेत्रातील दुर्मीळ वनस्पती, दुर्मीळ प्राण्यांच्या प्रजाती, भाताच्या जातीची नोंदणी करून यासंदर्भात शासनाच्या नगरविकास खात्याला माहिती देण्यात येणार आहे. दुर्मीळ वनस्पतीचे जतन करण्यासाठी दुर्मीळ वनस्पतींचे एक
उद्यान तयार करण्याचा मानस या समितीचा असणार आहे.

Web Title: The topic of the Haidosa of Mokat dogs was heard in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.