लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महानगरपालिकेच्या ५३ शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सुमारे २९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तूस्वरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे पालन करत, सोमवारपर्यंत २० शाळांमधील ६५४५ विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये १ कोटी ४१ लाख ८२ हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.उर्वरित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खात्यातही लवकरच अनुदान जमा केले जाणार आहे. महापालिकेच्या वतीने पालकांनादेखील आवाहन करण्यात आले असून, शैक्षणिक साहित्य खरेदी करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी केले आहे. शैक्षणिक साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी केलेल्या वस्तूंची व सादर केलेल्या पावतीची शहानिशा करून पूर्णपणे खातरजमा झाल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेंतर्गत सुनिश्चित रक्कम जमा केली जात असल्याची माहिती संगवे यांनी दिली. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पुरेपूर साहाय्य करण्यात आले आहे. या आधार क्रमांकाशी निगडित खात्यातच अनुदान जमा केले जाणार आहे. कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढत रोख स्वरूपात थेट लाभ देण्याच्या पारदर्शक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ३३ शाळांमधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदी प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार असून, या विद्यार्थ्यांच्या खात्यातही अनुदान जमा केले जाईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली. शैक्षणिक साहित्यामध्ये शाळेचा गणवेश, दप्तर, बूट, पीटी आणि स्काउट गाइड गणवेश यांचा समावेश आहे. याकरिता वर्गनिहाय अनुदानाची रक्कम ठरवून देण्यात आली आहे.
महापालिकेतील विद्यार्थ्यांच्या खात्यात १ कोटी ४१ लाख जमा
By admin | Published: June 20, 2017 6:05 AM