मयूर तांबडे / पनवेलतालुक्यातील ग्रामपंचायती लवकरच बॉडबॅण्डने जोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील शाळांमध्येही डिजिटलायझेशनवर भर देण्यात येत असला तरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ५१ शाळांमध्ये संगणक नसल्याची माहिती समोर आली आहे. तर ७३ शाळांमध्ये ११५ संगणक बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे संगणकाविना विद्यार्थी ई-लर्निंगचे शिक्षण कसे घेणार असा प्रश्न उद्भवत आहे. पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २५२ शाळा आहेत. यातील ७३ शाळांत ११५हून अधिक ठिकाणी संगणक नादुरु स्त होऊन धूळखात पडले आहेत. तर ५१ शाळांमध्ये संगणकच नाहीत. एकीकडे विद्यार्थ्यांना संगणकांची माहिती व्हावी, यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कोट्यवधी रु पये खर्च करीत असताना जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये मात्र स्मार्ट शिक्षकाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. काही शाळांत संगणक आहेत; मात्र ते बंद असतात. काही शाळांतील संगणक केवळ शिक्षकांकडून चालवले जातात. त्यामुळे मुलांना संगणकाचे शिक्षण देणे तर दूरच राहते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान मिळावे, ते स्पर्धेच्या युगात टिकावेत यासाठी वाड्या-वस्त्यांवरील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पनवेलमधील ५१ शाळांमध्ये संगणकच नसल्याने शाळा डिजिटल कशा होतील? असा प्रश्न विचारला जात आहे. ई-लर्निंगमधून पनवेलमधील काही शाळांना संगणक मिळाले आहेत. सध्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २०१ शाळांत ३६४ संगणक आहेत. यापैकी जवळपास ४० टक्के संगणकांची अवस्था बिकट आहे. काही ठिकाणी किरकोळ दुरु स्तीच्या प्रतीक्षेत संगणक अनेक दिवसांपासून शाळांमध्ये पडून आहेत, तर काही शाळांमध्ये संगणकाबाबत असलेल्या अज्ञानामुळे संगणक धूळखात पडून आहेत. संगणकांचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संगणक साक्षरता व्हावी, हा शाळांना संगणक देण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. शिक्षकांनाही अद्ययावत ज्ञान मिळावे, यादृष्टीनेच शाळांना संगणक पुरविण्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या शालेय शिक्षणापासून महाविद्यालयापर्यंत विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचे धडे देण्याची सक्ती केली, तरी आज शहरांसोबत ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये संगणक आलेले नाहीत. अनेक शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना संगणक शिकण्याची इच्छा असल्यामुळे काही शाळांमध्ये संस्थांनी संगणक उपलब्ध करून दिले आहेत. मात्र, प्रशिक्षण देणारे शिक्षकच नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये संगणक धूळखात पडले असल्याचे समोर आले आहे. शासनाने सर्वशिक्षा अभियानांतर्गत शाळा तेथे संगणक असणे गरजेचे असतानाही शाळेत संगणकांची सोयच नसल्याने हजारो विद्यार्थी या संगणकाच्या ज्ञानापासून वंचित आहेत. देशभरात डिजिटल इंडिया राबवीत असताना शाळेत संगणक नसतील, तर शाळा डिजिटल कशा करायच्या? पनवेलमधील काही शाळांमध्ये विजेची समस्या आहे. त्यामुळे शाळांना अडचणी येत आहेत. काही शाळेत रोटरी क्लब, ग्रामपंचायत निधीतून संगणक दिले आहेत. तर काही शाळांमध्ये ग्रामस्थांनी वर्गणी काढून संगणक दिले आहेत. मात्र, अद्यापही तालुक्यातील काही शाळांतील विद्यार्थी संगणकापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
संगणकाविना तब्बल ५१ शाळा
By admin | Published: January 14, 2017 7:07 AM