ऐरोलीतील खाडीकिनारचे कांदळवन बनले पर्यटनस्थळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 01:39 AM2019-04-29T01:39:05+5:302019-04-29T01:39:48+5:30
विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे दर्शन : जैवविविधता केंद्रामुळे पर्यटकांमध्ये उत्साह; बोट सफारीचा आनंद
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : वन खात्यामार्फत ऐरोलीत उभारण्यात आलेले जैवविविधता केंद्र पर्यटकांसाठी सुवर्णपर्वणी ठरत आहे. त्या ठिकाणी प्रतिदिन सुमारे ६० ते ७० पर्यटक येत असून मागील दीड वर्षात २२ हजार ५०० जणांनी केंद्राला भेट दिली आहे. त्यापैकी बहुतांश पर्यटक बोट सफरीच्या माध्यमातून सुमारे २५० प्रजातीच्या पक्ष्यांपैकी ऋतूनुसार दिसणारे पक्षी नजरेत कैद करण्याच्या उद्देशाने येत असतात.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनातर्फे ऐरोली येथील खाडीकिनारी फ्लेमिंगो अभयारण्य संवर्धन करण्यात आले आहे. त्याकरिता किनारी व सागरी जैवविविधता केंद्र तयार करण्यात आले आहे. ठाणे ते वाशी दरम्यानच्या खाडीकिनारी भागात दृष्टीस पडणाऱ्या पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे, तर काही पक्षी व माशांच्या प्रतिकृतीही मांडण्यात आल्या आहेत. गेल्या दीड वर्षांत सुमारे २२ हजार ५०० पर्यटकांनी या केंद्राला भेट दिली आहे.
पर्यटकांचा उत्साह लक्षात घेऊन वनखात्यातर्फे काही महिन्यांपासून त्या ठिकाणी बोटिंगची सोयही करण्यात आली आहे. साधारण एका तासाच्या या बोट सफरीच्या माध्यमातून ऐरोली ते वाशीपर्यंतच्या कांदळवनातील पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे, त्यामुळे बोट सफरीसाठी येणाºया पर्यटकांच्याही संख्येत वाढ होत चालली आहे. ठाणे ते वाशी दरम्यानच्या खाडीमध्ये २५० पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये फ्लेमिंगोसह वूड सॅण्डपायपर व इतर देश विदेशातील स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांचा समावेश आहे. त्यापैकी बहुतांश पक्षी ऋतूनुसार नजरेस पडणारेही आहेत.
जैवविविधता केंद्रात ब्ल्यू व्हेल माशाचा ४० फुटांचा सांगाडा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक योग्य ती तयारी त्या ठिकाणी सुरू आहे. त्याशिवाय पर्यटकांना अधिकाधिक वेळ खिळवून ठेवण्यासाठी, तसेच त्यांच्या विरंगुळ्यासाठी जर्मनच्या तंत्रज्ञानावर आधारित उद्यान उभारले जाणार आहे. पुढील काही महिन्यांत या दोन्ही बाबींची त्या ठिकाणी भर पडलेली असेल, यामुळेही नवी मुंबईकरांना कांदळवन पर्यटनासह विरंगुळ्याचीही सोय उपलब्ध होणार आहे.
ब्ल्यू व्हेल माशांचा ४० फुटांचा सांगाडा
जैवविविधता केंद्रातील नावीन्यात भर टाकण्यासाठी त्या ठिकाणी ब्ल्यू व्हेल माशाचा सांगाडा ठेवला जाणार आहे. सुमारे ४० फुटांचा हा अवाढव्य सांगाडा पाहण्यासाठी पर्यटकांची रिग लागण्याची शक्यता येत्या काळात आहे. या दरम्यान पर्यटकांच्या विरंगुळ्याची सोय म्हणून केंद्राच्या मागच्या जागेतच जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आकर्षक उद्यान उभारले जाणार आहे.
विविध पक्षी व समुद्री जीवांची माहिती देणारे हे जैवविविधता केंद्र सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवशी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुले असते. याच कालावधीत बोटीद्वारे कांदळवनातील पक्षी पाहता येतात. याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक असून, ओहोटीच्या वेळी मात्र ही सुविधा बंद असते. जैवविविधता केंद्र उभारल्यापासून त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. प्रतिदिन सुमारे ६० ते ७० नागरिक त्या ठिकाणी भेट देत आहेत. मागील दीड वर्षांत या केंद्राला २२ हजार ५०० पर्यटकांनी भेट देऊन शासनाच्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला आहे.
पक्षीअभ्यासकांसह शालेय विद्यार्थ्यांचे आकर्षणाचे केंद्र
22,500 पर्यटकांनी दीड वर्षात दिली भेट
250 हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती