अलिबाग : दिवाळी सणामध्ये ११ ते १५ नोव्हेंबर असा सलग सुट्यांचा महाधमाका प्राप्त झाल्याने रायगड जिल्ह्यातील पर्यटनाची हॉट डेस्टिनेशन्स पर्यटकांनी चांगलीच फुलून गेली होती. अलिबागसह मुरुड, माथेरान, श्रीवर्धन अशा ठिकाणी पर्यटकांनी पर्यटनाबरोबरच दिवाळीच्याा सणाचा आनंद लुटला. पर्यटनाची हौस असणाऱ्यांनी सलग आलेल्या सुट्यांचे प्लॅनिंगही आधीच करून ठेवलेले होते. अलिबाग, मुरुड, माथेरान ही ठिकाणे मुंबई, पुण्यापासून जवळ आहेत. त्यामुळे येथे पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. ही ठिकाणे पर्यटकांची हॉट डेस्टिनेशन्स म्हणून लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळे येथील हॉटेल्स, लॉजिंग, रेस्टारंट, कॉटेजेस पर्यटकांनी फुलून गेली होती.अलिबागमधील अलिबाग किल्ला, आक्षी, नागाव, वरसोली, किहीम, मांडवा येथील विस्तीर्ण समुद्र किनारे, निळाशार समुद्र, नारळी पोफळीच्या बागा, मुरुड तालुक्यातील काशिद, मुरुड-जंजिरा किल्ला, श्रीवर्धन, दिवेआगरचे सुवर्ण गणेशमंदिर, माथेरान येथील थंड हवेचे ठिकाण, तेथील मिनी ट्रेन पर्यटकांना नेहमीच खुणावत आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळे, बौद्धकालीन लेणी, ऐतिहासिक गडकिल्ल्यांना पर्यटकांनी भेटी दिल्या. देशी पर्यटकांबरोबरच काही विदेशी पर्यटकांनीही येथे हजेरी लावत पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. (प्रतिनिधी)
पर्यटनस्थळे गजबजली
By admin | Published: November 14, 2015 3:36 AM