चिरनेरच्या मातीच्या भांड्यांची पर्यटकांना भुरळ, व्यावसायिकांना सुगीचे दिवस!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 09:28 PM2023-05-12T21:28:56+5:302023-05-12T21:29:38+5:30
मातीच्या भांड्यांची मागणी वाढली असून व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
मधुकर ठाकूर -
उरण : चिरनेरच्या महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांना सध्या तयार करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या मातीच्या भांड्यांची भुरळ घातली आहे. त्यामुळे मातीच्या भांड्यांची मागणी वाढली असून व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले आहेत.
चिरनेर ऐतिहासिक गावात कुंभार समाजाची ३२ कुटुंब पिढ्यानपिढ्या वास्तव करत आहेत.या समाजाचे उदरनिर्वाह मुख्य साधन म्हणजे शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविणे आणि नागरीकांना संसारासाठी आवश्यक असणारी शेत जमिनीतील मातीपासून खापरी,मटन किंवा मासळी बनवायला तवा, जोगळ्या,भीन,मडकी आदी विविध प्रकारची भांडी बनविणे हा प्रमुख व्यवसाय आहे.परंतु आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हळूहळू मातीच्या भांड्याची मागणी कमी कमी होत गेल्याने कुंभार समाजांवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यानंतरही येथील कुंभार समाजाने पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय टिकवण्यासाठी, वाढवण्याची धडपड सुरूच ठेवली आहे.
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात घरगुती गॅस, विद्युत शेगड्यांवर तसेच स्टील अथवा अन्य धातुच्या भांड्यात अन्न पदार्थ शिजवले जातात.मात्र असे शिजवलेले अन्न हे शरीराला ऊर्जा देणारे नसल्याने चविष्ट नसल्याचे सांगितले जात आहे.मात्र शहरी भागात कमी जागेत मातीची चुल,मातीची भांडी ठेवण्यात अनंत अडचणी येतात.त्यामुळे शहरात तरी मातीच्या भांड्यांचा वापर फारसा केला जात नाही.
मात्र चूलीवर, मातीच्या भांड्यात शिजवलेल्या अन्न पदार्थ रुचकर लागते.तसेच वाढत्या उष्णतेत घागर अथवा माठ, मडक्यातील थंडगार पाणी गारवा देणारे ठरते.त्यामुळे शहरी असो की ग्रामीण दोन्ही भागातील नागरिकांचा कळ मातीच्या भांड्यांकडे आहे.तरी काही जण घरातील शोभा वाढविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो.त्यांना आकर्षक,सुबक रंगरंगोटी करून दिवाणखाना, शोकेसमध्ये सजविण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर केला जात आहे.
ऐतिहासिक महत्त्व असलेल्या चिरनेर येथील श्री महागणपती देवस्थानाच्या भेटीला, दर्शनासाठी शेकडो हौशी पर्यटक मुंबई, नवीमुंबई, ठाणे,पनवेल परिसरातुन येतात.दररोज येणाऱ्या अशा शेकडो हौशी पर्यटकांना सध्या चिरनेर येथील मातीच्या भांड्यांची पर्यटकांना भुरळ घातली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चिरनेरच्या मातीच्या भांड्यांच्या खरेदीसाठी हौशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे.परिणामी चिरनेरच्या कुभारांनाही सुगीचे दिवस येऊ लागले आहेत.
परिसरात येणाऱ्या हौशी पर्यटकांचा कल चिरनेरच्या मातीच्या भांड्यांची खरेदी करण्याकडे वाढला आहे. पर्यटकही मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांना पसंती दर्शवित आहेत.त्यामुळे येथील व्यावसायिकांना चांगले दिवस येऊं पाहात आहे.मात्र पारंपारिक कला जोपासण्यासाठी कुंभार समाजाला शासनाची मदत आवश्यक असल्याचे व्यावसायिक नंदकुमार चिरनेरकर याचं म्हणणं आहे.