कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 02:43 AM2018-07-16T02:43:12+5:302018-07-16T02:43:15+5:30
पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे.
वैभव गायकर
पनवेल : पर्यटनाच्या दृष्टीने सुरक्षित असलेल्या कर्नाळा अभयारण्याला पर्यटकांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. मुंबई, नवी मुंबईमधील पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात आपली सुट्टी घालवण्याची संधी मिळाल्याने पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होताना दिसत आहेत. रविवारी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली.
कर्नाळा अभयारण्य नैसर्गिक विविधतेने नटलेले ठिकाण आहे. विदेशी जातीचे पक्षी, वन्यजीव, तसेच मोठ्या संख्येने धबधब्यांचा या ठिकाणी समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरक्षेच्या दृष्टीने अनेक पर्यटन ठिकाणे पावसाळ्यात बंद ठेवली जात असल्याने पर्यटक कर्नाळा अभयारण्यात मोठ्या संख्येने येत असतात. आतापर्यंत दहा हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्याला भेट दिली आहे. ही संख्या २५ हजारांपेक्षा जास्त होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पर्यटकांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
>पर्यटकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी १३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकडून प्रवेश फीदेखील आकारण्यात येत असल्याने वनविभागालाही या ठिकाणाहून चांगला नफा प्राप्त होत आहे. रविवारी या ठिकाणी १२००पेक्षा जास्त पर्यटकांनी भेट दिली.
>वर्षासहलीसाठी उरणमध्येही गर्दी
उरण : पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात ते वर्षासहलीचे. परिसरात असणारे धबधबे, धरणे, बीच आदी स्थळांना पावसाळ्यात पसंती दिली जाते. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर जिल्हाधिकाºयांनी बंदी घातली आहे. त्यामुळे वर्षासहलीसाठी आता मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि लगतच्या भागातील पर्यटकांनी उरण परिसरातील आक्कादेवी, पुनाडे, रानसईसह पिरवाडी बीचकडे मोर्चा वळविला आहे.
>गाढेश्वरची गर्दी माची करंबेळीकडे
शनिवारी व रविवारी तालुका पोलिसांनी गाढेश्वर परिसरातील वाजे फाट्यावर बंदोबस्त ठेवला असल्याने पर्यटकांना येथून परत जावे लागत आहे.
पर्यटक मुंबई, कोकण, पेण, उरण येथून गाढेश्वर धरणाकडे ये-जा करत असतात. मात्र पर्यटकांच्या या आनंदावर पोलिसांमुळे विरजण पडते व त्यांना माघारी जावे लागते. त्यामुळे पर्यटकांनी यावर नामी शक्कल लढवत तालुक्यातील धबधबे शोधून काढले आहेत. मोरबे गावाच्या पुढे ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या करंबेळी धबधब्याकडे पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
तर शेडुंग फाट्याच्या आतमध्ये वारदोली- ठाकूरवाडीजवळच्या माची धबधब्याला पर्यटक मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहेत. तर तालुक्यातील मोरबे धरणावर ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत.