पांडवकड्यासाठी पर्यटनप्रेमी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 01:34 AM2018-06-17T01:34:19+5:302018-06-17T01:34:19+5:30
विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत सिमेंटची जंगले उभारली जात आहेत, त्यासाठी निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या पारसिक डोंगराचाही मोठ्या प्रमाणात -हास करण्यात आला आहे.
- वैभव गायकर
पनवेल : विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत सिमेंटची जंगले उभारली जात आहेत, त्यासाठी निसर्गाचा अमूल्य ठेवा असलेल्या पारसिक डोंगराचाही मोठ्या प्रमाणात -हास करण्यात आला आहे. या डोंगराच्या कुशीत दडलेल्या लहान-मोठ्या पर्यटनस्थळांवरही निर्बंध घातले जात असल्याने पर्यटनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळ्यात पर्यटकांना भुरळ घालणारे खारघर येथील पांडवकडा हे एकमेव पर्यटनस्थळ आहे; परंतु वनविभागाने त्यावरही पर्यटकांना प्रवेश निषिद्ध केल्याने पर्यटनप्रेमींचा हिरमोड झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर पांडवकडा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करावा, अशी मागणी विविध स्तरांतून जोर धरू लागली आहे.
खारघरच्या निसर्गरम्य डोंगरकपारीतून वाहणारा पांडवकडा नवी मुंबईच नव्हे, तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटकांना भुरळ घालतो आहे. विशेषत: पावसाळ्यात या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. पावसाळ्यात १०० फूट उंचीवरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्यात चिंब भिजण्याची मौज काही औरच असते. विशेष म्हणजे, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या खारघर शहराचा फेरफटका मारण्याची संधीही या निमित्ताने पर्यटकांना मिळते. असे असले तरी अतिउत्साही पर्यटकांमुळे या पर्यटनस्थळाला गालबोट लागले आहे. मागील काही वर्षांत या धबधब्यात बुडून अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी होणारी जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने वनविभागाने मागील काही वर्षांपासून या धबधब्यावर पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे, त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक पर्यावरणप्रेमी संस्था व व्यक्ती आता पुढे सरसावल्या आहेत. सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना आखून हा पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. खारघर येथील भाजपाच्या नगरसेविका लीना गरड यांनी अलीकडेच यासंदर्भात वन विभागाला पत्र दिले आहे. वनविभागाचे अधिकारी डी. एस. सोनावणे यांची भेट घेऊन पांडवकड्यावरील पर्यटकबंदी उठविण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश दिल्यास स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने या ठिकाणी सुरक्षारक्षक तैनात करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. यासंदर्भात वनविभागाचे अधिकारी सोनावणे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवारी एक संयुक्त बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे.
।स्थानिकांच्या रोजगारावर गदा
पावसाळ्यात पांडवकडा धबधब्यावर येणाºया पर्यटकांची संख्या लक्षणीय असते, त्यामुळे आजूबाजूच्या गावांतील ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध होतो; परंतु मागील काही वर्षांपासून पर्यटकांना या ठिकाणी बंदी घातल्याने स्थानिकाचा रोजगार बुडाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना आखून पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी खुला केल्यास स्थानिकांना रोजगार तर मिळणारच आहे. शिवाय, त्यातून वनविभागालाही महसूल प्राप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर वनविभाग आणि संबंधित यंत्रणांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावे, अशी पर्यटनप्रेमींची मागणी आहे.
।शिवसेनाही आंदोलनाच्या पवित्र्यात
नवी मुंबई परिसरात पांडवकडा हे एकमेव पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात कौटुंबिक सहलीसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, असे असले तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव वन विभागाने पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या उपाययोजना आखून, हा धबधबा पर्यटकांना खुला करावा, अशी मागणी शिवसेनेचे वाशी विभागाचे उपशहरप्रमुख प्रफुल्ल म्हात्रे यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात अलीकडेच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डी. एम. सोनावणे यांना पत्र दिले आहे. या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. सुरक्षिततेच्या ठोस उपाययोजना उपलब्ध कराव्यात. यासंदर्भात तातडीने निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे.
।दहा वर्षांत
२६ जणांना जलसमाधी
खारघरच्या निसर्गरम्य डोंगररांगातून वाहणाºया पांडवकडा धबधब्याचे पर्यटकांना विलक्षण आकर्षण राहिले आहे. पावसाळ्यात या ठिकाणी हजारो पर्यटक भेट देतात, असे असतानाही या स्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे मागील दहा वर्षांत या धबधब्यात मौजमजा करायला असलेल्या २६ जणांना जलसमाधी मिळाली आहे.
।बांधकाम विभागाची उदासीनता
पांडवकडा धबधब्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी सिडकोने एक कोटी ३३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे; परंतु लोणावळा, खंडाळा, येथील टायगर पॉइंट, शहापूर येथील नैसर्गिक पर्यटनाच्या धर्तीवर पांडवकड्याचा विकास करावा, असा वनविभागाचा प्रस्ताव आहे. त्यानुसार सिडकोने तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला हा निधी उपलब्ध करून दिला आहे. तारेचे कुंपण आणि धबधब्याच्या परिसरात काहीशा सुधारणा वगळता, सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. हा निधी तसाच पडून असल्याने पांडवकड्याचा विकास खुंटला आहे. त्याचा फटका हजारो पर्यटकांना बसला आहे.