वंडर्स पार्कमधील खेळणी बंद, पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 01:37 AM2019-05-04T01:37:18+5:302019-05-04T01:37:37+5:30
नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.
नवी मुंबई : नेरुळ येथील वंडर्स पार्कमधील क्रिकेट आणि मिकी माऊस यासारखी खेळणी दुरुस्तीअभावी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. या प्रकाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने सुट्टीत पार्कमध्ये मौज करण्यासाठी येणारी लहान मुले निराश होत आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नेरुळ येथे वंडर्स पार्क उद्यान निर्माण करण्यात आले आहे. शाळांना सुट्या लागल्याने पार्कमध्ये शहरातून आणि शहराबाहेरून येणाऱ्या नागरिकांची आणि लहान मुलांची संख्या वाढली आहे.
लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना देखील मौजमजा करता येईल अशा प्रकारची आकर्षक खेळणी या पार्कमध्ये बसविण्यात आलेली आहेत. परंतु खेळणी जुनी झाली असून या खेळण्यांची देखभाल, दुरुस्ती देखील वेळेवर होत नसल्याने खेळणी बंद असतात त्यामुळे पार्कमध्ये येणारी लहान मुले निराश होत आहेत. गेल्या महिनाभरात ऑक्टोपस पाळणा, टॉय ट्रेन, क्रिकेट आणि मिकी माऊससारखी खेळणी बंद पडली होती. यामधील ऑक्टोपस पाळण्याचा दुरु स्तीचे काम सुरू असून क्रिकेट आणि मिकी माऊस ही खेळणी दुरु स्तीअभावी अद्याप बंदच आहेत. महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांचे आकर्षण असणाºया वंडर्स पार्कमधील या सुविधांचा बोजवारा उडाला असल्याने नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.