नामदेव मोरे, नवी मुंबई : कोरोनापासून महानगरपालिकेच्या चार उद्यानांमधील टॉय ट्रेन बंद आहे. टॉय ट्रेनची सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. देखभालीसह चालविण्याची जबाबदारी ठेकेदारावर सोपविण्यात येणार असून, यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळमधील संत गाडगेबाबा उद्यान, वाशीमधील मीनाताई ठाकरे उद्यान, ऐरोलीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व दिघा येथील बालमित्र साने गुरुजी उद्यानामध्ये टॉय ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कोरोनापूर्वी ही सुविधा सुरळीतपणे सुरू होती. कोरोनाकाळात बंद झालेली ट्रेन पुन्हा सुरळीत सुरू झाली नाही. उद्यानामध्ये येणारी मुले टॉयट्रेनमध्ये बसण्याचा हट्ट करतात; पण ती बंद असल्यामुळे हा हट्ट पालकांना पुरविता येत नाही. महानगरपालिकेने पुन्हा टॉय ट्रेन सुरू करावी, अशी मागणीही केली जात होती; परंतु विविध कारणांनी ट्रेन सुरू होत नव्हती. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मुलांसाठी टॉयट्रेन पुन्हा सुरू करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. विभागप्रमुखांच्या बैठकीमध्येही याविषयी पाठपुरावा केला होता. प्रशासनाने टॉयट्रेनची देखभाल व व्यवस्था पाहण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे.
उद्याननिहाय टॉयट्रेन-
उद्यान - आसनक्षमतासाने गुरुजी उद्यान दिघा - १६डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, ऐरोली - १६मीनाताई ठाकरे उद्यान, वाशी - २०संत गाडगेबाबा उद्यान, नेरूळ - १६