रेशनवर तूरडाळ विकण्यास दुकानदार संघटनेचा विरोध, १ आॅगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा
By admin | Published: July 6, 2016 08:12 PM2016-07-06T20:12:19+5:302016-07-06T23:10:42+5:30
रेशन दुकानांमधून तूरडाळ विक्री करण्याच्या शासन निर्णयास मुंबई रेशन दुकानदार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचा रोषही
चेतन ननावरे
मुंबई, दि. ६ : रेशन दुकानांमधून तूरडाळ विक्री करण्याच्या शासन निर्णयास मुंबई रेशन दुकानदार संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात संघटनेसोबत कोणतीही चर्चा केली नसल्याचा रोषही संघटनेने व्यक्त केला आहे. शिवाय गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशाराही संघटनेचे
अध्यक्ष नवीन मारू यांनी दिला आहे.
लोकमतला दिलेल्या प्रतिक्रियेत मारू म्हणाले की, सरकारने १२० रुपये किलो दराने तूरडाळ विक्री करण्याची घोषणा केली. मात्र त्यामागे प्रति किलो किती रुपयांचे अनुदान असेल, याची माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे १२० रुपये किलो दराने आॅगस्ट ते आॅक्टोबरदरम्यान तूरडाळ विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. संघटनेतील
दुकानदार स्वत: ११० ते ११५ रुपये प्रति किलो रुपये दराने तूरडाळ विक्री करू शकतात. त्यामुळे १२० रुपये प्रति किलो दराने डाळ विक्री करण्यामागील उद्दीष्ट काय? याचा खुलासा संघटनेने मागितला आहे.
डोअर डिलीव्हरी योजना संपूर्ण राज्यात लागू करण्याची मागणी सातत्याने दुकानदार संघटना करत असल्याचे मारू यांनी सांगितले. ते म्हणाले की, दुकानदारांच्या कमिशनच्या मुद्द्यावरही सरकार केवळ आश्वासने देत आहे. परिणामी आॅगस्ट महिन्यापासून धान्याचे मागणीपत्र (इंडेन्ट) रेशनिंग कार्यालयात भरून त्यासाठीचे पैसेही दुकानदार भरतील. मात्र गोदामातील माल दुकानदार उचलणार नाहीत. १ आॅगस्टपासून मुंबईसह राज्यातील सर्व दुकाने बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.
.........................
राज्यव्यापी सभा मुंबईत
१ आॅगस्टपासून होणाऱ्या बेमुदत संपाची व्यूहरचना करण्यासाठी लवकरच मुंबईत राज्यव्यापी सभा होणार असल्याचे संघटनेने सांगितले. या सभेमध्ये मुंबईतील हजारो दुकानदारांसोबत राज्य कार्यकारिणी आणि प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित असतील. सभेमध्येच राज्यव्यापी बेमुदत बंदची घोषणा केली जाईल. सभेबाबतची संपूर्ण माहिती दुकानदारांना व्हॉट्सअॅप आणि प्रसारमाध्यमांद्वारे कळवणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
.........................
..तर पामतेल प्रति लीटर ५५ रुपयांनी विकू
रेशनिंग दुकानदार संघटनेने मार्च ते मे महिन्यादरम्यान रेशन पाम तेल नावाने पामतेल प्रति लीटर ५५ रुपये दराने विकून दाखवले. मात्र आत्ता पामतेलचा दर प्रति लीटर ६० रुपये आहे. रेशन दुकानदारांना पामतेलवरील व्हॅट माफ केल्यास पुन्हा रेशन दुकानांतून प्रति लीटर ५५ रुपयांहून कमी दराने पामतेल विक्री करू, अशी घोषणाही संघटनेने केली आहे.
...........................
नेमकी मिठाई कोणाला?
सणासुदीच्या काळात मिठाईसाठी लागणाऱ्या डाळीचे भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त करत सरकारने तूरडाळ १२० रुपये प्रति किलो दराने विकण्याची घोषणा केली. मात्र मिठाई तयार करण्यासाठी आवश्यक हरभऱ्याची डाळ स्वस्त दराने विकण्याऐवजी तूरडाळ विकून कोणाला मिठाई मिळणार आहे? असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. वाहतुकदारांनी १५ दिवसांचा संप पुकारला, त्यावेळी बाजारात साखरेची किंमत दुप्पट झाली होती. अशा परिस्थितीतही संघटनेने आहे
त्या दरातच साखर उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे संघटनेला विश्वासात घेतल्याशिवाय तूरडाळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारची डाळ विकणार नसल्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.