भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गुंडगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:39 AM2017-07-21T03:39:52+5:302017-07-21T03:39:52+5:30

भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला.

Traders' bullying in the vegetable market | भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गुंडगिरी

भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्याची गुंडगिरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भाजी मार्केटमध्ये अवैधपणे कांदा-बटाट्याचा व्यापार करणाऱ्या सागर बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. सुरक्षा अधिकाऱ्यांना व एपीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चोर असल्याचे संबोधत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आहे. याप्रकरणी सुरक्षारक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दिली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटच्या गेटवर व मार्केटमध्येही अनधिकृतपणे कांदा-बटाट्याची विक्री केली जात आहे. व्यापार करणारे सुरक्षारक्षकांना व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करून बिनधास्तपणे व्यापार करत आहेत. प्रवेशद्वाराच्या बाहेरील मुख्य रस्ताही अडविला जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊ लागली आहे. यापूर्वी राजेंद्र बारवे या व्यापाऱ्याने सुरक्षारक्षकांना शिवीगाळ केल्याची घटना घडली होती. प्रत्येक वेळी सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना माहिती दिली आहे.
काही वेळा एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही दिल्या आहेत; परंतु शासकीय कामात अडथळा आणून कर्मचाऱ्यांना धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनीही प्रत्येक वेळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. बाजार समितीचे अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकारीही कधीच सुरक्षारक्षकांच्या पाठीशी उभे राहात नाहीत. गुरुवारी पहाटे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बारवे यांच्या गाडीवर कारवाई केली होती. या कारवाईचा राग येऊन राजेंद्र बारवे यांचा मुलगा सागर बारवे घटनास्थळी येऊन त्याने सुरक्षा कर्मचारी भीमराव पाटील यांना व इतरांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कारवाई काय केली, असा जाब विचारला. मार्केटमध्ये चोरी करणाऱ्यांना तुमचे अधिकारी काही करत नाहीत. अधिकारी चोर आहेत. आम्हाला काय शिकविता. तुम्हाला सर्वांना बघून घेतो, अशा प्रकारची धमकी देऊन या प्रकाराचे चित्रीकरण करणाऱ्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. या प्रकाराविषयी पाटील यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदविली आहे. सागर बारवे शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्यामुळे कर्मचारी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली असून व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.

सुरक्षारक्षकांना वाली नाही
एपीएमसीमधील सुरक्षा अधिकारी व कर्मचाऱ्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य दिले जात नाही. त्यांच्या कामामध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे. अध्यक्ष, सचिव व मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून सुरक्षा विभागाचे मनोबल वाढविण्यासाठी काहीही केले जात नाही. कोणी तक्रार केली की सुरक्षारक्षकांना बोर्डात पाठविण्याचा इशारा दिला जात असून त्यांना धमकावणाऱ्यांवर मात्र कडक कारवाई केली जात नसल्याने कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Traders' bullying in the vegetable market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.