कांदा मार्केटमध्ये वाहतूकदारांचा बंद; रिक्षातून मालवाहतुकीला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:32 AM2020-01-16T00:32:12+5:302020-01-16T00:32:32+5:30
दुपारी २ वाजेपर्यंत व्यवहार ठप्प
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील वाहतूकदारांनी बुधवारी अचानक बंद केला. यामुळे दुपारपर्यंत मार्केटमधील व्यवहार ठप्प होते. रिक्षातून सुरू असलेल्या माल वाहतुकीला वाहतूकदार संघटेनेने विरोध केला असून, संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही महिन्यांपासून प्रवासी वाहतूक सुरू असलेल्या रिक्षांमधून माल वाहतूक सुरू आहे. रिक्षांमधून मालवाहतूक बंद करण्याची मागणी लॉरी-टेम्पो ओनर्स असोसिएशनने केली होती. याविषयी वारंवार बाजार समितीकडे तक्रार केली होती. डिसेंबरमध्येही याविषयी बैठक झाली होती. प्रशासनाने रिक्षाला बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते; परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. मंगळवारी रिक्षाचालकाची व टेम्पो चालकामध्ये शाब्दिक वाद झाला, यामुळे संतापलेल्या वाहतूकदारांनी बुधवारी काम बंद आंदोलन केले. वाहतूकदारांच्या संपामुळे मार्केटमधील कामकाज ठप्प झाले होते.
बंदची दखल घेऊन बाजार समिती प्रशासनाने तत्काळ वाहतूकदारांची भेट घेतली. या विषयावर चर्चा करण्यासाठी २३ जानेवारीला बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेचे पदाधिकारी अमर शेलार, महेश गव्हाणे, पोपट पवार, शिवाजी मोरे, अस्लम इनामदार, गणपत जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.