दिवाळीत हायवेवर फिरण्याची परंपरा

By admin | Published: November 12, 2015 01:57 AM2015-11-12T01:57:43+5:302015-11-12T01:57:43+5:30

प्रत्येक सण उत्सव साजरे करण्याची त्या-त्या ठिकाणची प्रथा, परंपरा वेगवेगळीच असते. महाडमध्ये तसे प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात

Tradition on the highway to Diwali | दिवाळीत हायवेवर फिरण्याची परंपरा

दिवाळीत हायवेवर फिरण्याची परंपरा

Next

महाड : प्रत्येक सण उत्सव साजरे करण्याची त्या-त्या ठिकाणची प्रथा, परंपरा वेगवेगळीच असते. महाडमध्ये तसे प्रत्येक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र, दिवाळीच्या सकाळी हायवेवर फिरायला जाऊन मौजमजा करण्याची महाडकरांची प्रथा काही औरच आहे. वर्षानुवर्षे अखंडपणे सुरू असलेली महाडकरांची ही नावीन्यपूर्ण परंपरा शहरात नव्याने आलेल्या व्यक्तींना भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. आपोआपच त्या व्यक्तीदेखील या प्रथेचे अनुकरण करीत, दिवाळी सणाचा आनंद अधिक द्विगुणीत करताना दिसून येतात.
दिवाळीत नरकचतुर्दशी ते भाऊबीज या दिवसांत सकाळी शहरानजीक हायवेवर फिरायला जाण्याची प्रथा वर्षानुवर्षे महाडकरांनी जपलेली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून अभ्यंग्यस्नान करून महाडकर हायवेवर फिरायला बाहेर पडतात. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत हायवेवर अक्षरश: जत्रेचे स्वरूप आल्याचे पाहायला मिळते. अगदी अबालवृद्धांपासून महाविद्यालयीन तरुण-तरुणी नवनवीन पोषाख परिधान करून हायवेवर फिरताना दिसून येतात. हायवेवर हजारो महाडकरांची ही गर्दी पाहून महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमधील प्रवासीदेखील अचंबित होतात.
नोकरी व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले महाडकर दिवाळीनिमित्त या आनंदाची जणू प्रतीक्षाच करीत असतात. महाडकर आणि दिवाळीत सकाळी हायवेवर फिरायला नाही, असे कधी होतच नाही. महाड सोडून अन्य ठिकाणी, तसेच सातासमुद्रापलीकडे गेलेल्यांनाही महाडकारांच्या या प्रथेचे विस्मरण होत नाही.
जगाच्या पाठीवर कुठेही अशी प्रथा नसेल. मात्र, महाडकरांची दिवाळीत फिरायला जाण्याची ही प्रथा परंपरा अगदीच न्यारी म्हणावी लागेल. (वार्ताहर)

Web Title: Tradition on the highway to Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.