पारंपरिक पणत्या, मॅजिक लॅम्पला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 04:50 AM2018-10-28T04:50:51+5:302018-10-28T04:51:13+5:30

मातीच्या पणत्यांना मोठी मागणी : पाच ते १०० रुपये प्रतिनगापर्यंत या वस्तूंची विक्री

The traditional parrot, Magic Lamp choice | पारंपरिक पणत्या, मॅजिक लॅम्पला पसंती

पारंपरिक पणत्या, मॅजिक लॅम्पला पसंती

googlenewsNext

पनवेल : आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या, फटाक्यांची आतशबाजी म्हणजे दिवाळी. चिनी बनावटीच्या वस्तूंनी दिवाळीची बाजारपेठ काबीज केल्याची ओरड होत असली, तरी आजही पारंपरिक पद्धतीने दिवाळी साजरी करण्याला प्राधान्य देणारा मोठा वर्ग आहे. बाजारात आकर्षक, रंगबिरंगी पणत्या विक्रीसाठी उपलब्ध असल्या तरी मातीच्या पणतींची मागणी कायम आहे.

पनवेलमधील युसूफ मेहरअली सेंटरमध्ये पारंपरिक बनावटीच्या विविध वस्तूंना पसंती दर्शवण्यात येत आहे. दिवाळीमध्ये आकर्षक नावीन्यपूर्ण मातीच्या पणत्या या ठिकाणी तयार केल्या जात आहेत. कर्नाटकमधील पेरेकोटा मातीपासून युसूफ मेहरअली सेंटरमध्ये निसर्गदीप (मॅजिक लॅम्प) बनविले जातात. या दिव्यांमध्ये सुमारे ५० ग्रॅम तेल राहते. विशेष म्हणजे, सुमारे आठ तास हा दिवा तेवत राहतो. मॅजिक लॅम्पची मागणी वर्षानुवर्षे वाढत असून, सुमारे ४५०० ते ५००० नग मुंबई, पुणे, वाशी, मालाड, पेण या ठिकाणी दिवाळीपूर्वी पाठविले जातात. अवघा पाच रुपये प्रतिनग ते १०० रुपये प्रतिनगापर्यंत या वस्तूंची विक्री केली जाते.

मॅजिक लॅम्पची निर्मिती करणारे प्रकाश तांबे सांगतात की, दिवाळीपूर्वी तीन महिने पणत्या बनविण्यास सुरुवात करतो. सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विविध आकारातील पणत्या बनवतो. यामध्ये लीप पणत्या, साध्या पणत्या, बेस पणती, फ्लॉवर पॉट आदी बनविले जात असल्याचे तांबे यांनी सांगितले.

रोजगार निर्मिती
युसूफ मेहरअली सेंटरमध्ये बनविल्या जाणाऱ्या अनेक वस्तू टिकाऊ आहेत. यामुळे अनेकांना रोजगाराची संधी निर्माण होत असते. मात्र, या वस्तूंची जाहिरात होत नसल्याची खंत हस्तकलाकार प्रकाश तांबे यांनी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
युसूफ मेहरअली सेंटर मार्फत नवी मुंबई, पनवेलमधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पणत्या बनविण्याच्या दृष्टीने प्रशिक्षक शिबिर आयोजित केली जातात. या प्रशिक्षण शिबिरात विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या पणत्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.

Web Title: The traditional parrot, Magic Lamp choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.