गौरी विसर्जनानंतर गौरा उत्सवाची पारंपरिक प्रथा
By admin | Published: September 12, 2016 03:25 AM2016-09-12T03:25:12+5:302016-09-12T03:25:12+5:30
गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या गौरा देवाची स्थापना करण्याची विभागातील काही गावांमध्ये प्रथा आहे.
नागोठणे : गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या गौरा देवाची स्थापना करण्याची विभागातील काही गावांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार विभागातील वेलशेत गावातील हनुमान मंदिरात रविवारी श्री गौरा उत्सव धार्मिक वातावरणात मोठया जल्लोषात पार पडला.
इंग्रज काळापासून हा गौरा उत्सव या गावात साजरा केला जात असून गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या दरम्यान या गौरा देवाची स्थापना करण्याची परंपरा आहे. दिवसभर विविध कार्यक्र म घेण्यात येतात व सायंकाळी गौराची मिरवणूक गावात फिरविण्यात येते, त्याच दिवशी रात्री अंबा नदीत त्याचे भावपूर्ण विसर्जन करण्यात येते अशी माहिती सुधाकर पारंगे आणि संतोष कोळी यांनी दिली. या उत्सवाचे निमित्ताने वेलशेत येथील महिला मंडळासह श्री बिहरेश्वर महिला नाच मंडळ ( शिहू ), महिला नाच मंडळ (शेतजुई ), श्री जौरु आई महिला नाच मंडळ (बेणसेवाडी), महिला नाच मंडळ, शिहू आदी मंडळांच्या नाचांचे सामने घेण्यात आले.
गाव समितीचे अध्यक्ष तथा पिगोंडे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पारंगें यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या उत्सवासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रोशन पारंगे, विजय पारंगे, राजेंद्र ताडकर, अनिल पाटील आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. वेलशेत आयपीसीएल प्रकल्पग्रस्त गाव आहे. पूर्वी या गावाला मांडवा व पिगोंडे हे नाव होते, मात्र आता वेलशेत हे नाव प्रचिलत झाले आहे. (वार्ताहर)