नवी मुंबई विमानतळाची वाहतूक होणार सुसाट; गाढी नदीवर २ पूल, २१६ कोटींचा खर्च
By नारायण जाधव | Published: October 29, 2022 05:22 PM2022-10-29T17:22:32+5:302022-10-29T17:23:04+5:30
नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, मुंबई विमानतळावरील प्रवासी आणि कार्गो वाहतूक कमी करण्यासाठी ते बांधण्यात येत आहे.
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू असून, ते पूर्ण होण्याआधीच या विमानतळास रस्ते, रेल्वे आणि जलवाहतुकीने जोडण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून विमानतळाच्या पूर्व भागात गाढी नदीवर दोन पूल बांधण्यात येणार आहेत. या पुलांवर २१६ कोटी रुपये सिडको खर्च करणार आहे. यामुळे विमानतळाकडे पूर्वोत्तर भागाकडे जाणारी रस्ते वाहतूक सुसाट होण्यास मदत होणार आहे.
नवी मुंबई विमानतळ हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून, मुंबई विमानतळावरील प्रवासी आणि कार्गो वाहतूक कमी करण्यासाठी ते बांधण्यात येत आहे. या विमानतळासाठी लागणारी ११६० हेक्टर जमीन सिडकोने विकसकास पूर्णत: हस्तांतरित केली आहे. केवळ सिडकोच नव्हे, तर या विमानतळाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक सुसह्य व्हावी, यासाठी एमएमआरडीए, एमएसआरडीसी, रेल्वे विकास महामंडळ, मेरी टाईम बोर्ड या सर्व संस्था झटत आहेत.
रस्ते, रेल्वे, जलवाहतुकीने जोडणार
मुंबईकरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लवकरच पोहोचता यावे, यासाठी एमएमआरडीएने आधीच न्हावा-शेवा ते शिवडी या सी लिंकचे काम वेगाने सुरू केले आहे. शिवाय चिर्ले येथे हा रस्ता विमानतळासह मुंबई-पुणे महामार्गासह मुंबई-गोवा महामार्गास जोडण्यासाठी २६४९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत; तर दुसरीकडे सायन-पनवेल महामार्गावर वाशी येथे ७०० कोटींच्या तिसऱ्या खाडीपुलाच्या कामानेही वेग घेतला आहे. तसेच कोकणसह पश्चिम उपनगरांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडणाऱ्या विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. शिवाय धरमतर खाडीवर रेवस ते करंजा खाडीपूल बांधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नजिकच्या काळात पनवेल-सीएसटी लाेकलसह मेट्रोनेही जोडण्याचा शासनाचा मानस आहे. तसेच मुंबई-नवी मुंबई-ठाणे-मीरा-भाईंदर-विरार-कल्याण हा परिसर जलवाहतुकीद्वारे विमानतळास जोडण्यात येणार आहे.
पूर्वोत्तर कनेक्टिव्हिटी होणार मजबूत
यानंतर आता नवी मुंबई विमानतळाच्या पूर्वोत्तर भागातील कनेक्टिव्हिटी आणि मजबूज व्हावी, यासाठी गाढी नदीवर बी-४ आणि बी -५ हे दाेन पूल बांधण्याची प्रक्रिया सिडकोने सुरू केली आहे. या पुलांवर २१६ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे पनवेलसह मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवासह कल्याण-डोंबिवली, कर्जत परिसरातून ये-जा करणारी रस्ते वाहतूक आणखी सुसाट होण्यास मदत होणार आहे.