नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहत असलेल्या ठाणे - बेलापूर औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ए ब्लॉक व इलेक्ट्रॉनिक्स झोनमधील रस्त्यांवर एक ते दीड फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये पाणी साचले असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून, मोटारसायकलस्वार खड्ड्यांमध्ये पडण्याचे प्रमाण वाढले आहे.नवी मुंबईमधील औद्योगिक वसाहतीमध्ये छोटेमोठे पाच हजार व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत. दोन लाखांपेक्षा जास्त नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील समस्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या सोडविण्याकडे महानगरपालिका व एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले असले तरी त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. विशेषत: ए ब्लॉकमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. महापे ते शिळफाटाकडे जाणाऱ्या मुख्य रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर चार ठिकाणी एक ते दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून ट्रक व ट्रेलरच जाऊ शकतात. मोटारसायकल, कार व रिक्षा खड्ड्यांमध्ये अडकत आहेत. खड्ड्यांमुळे मोटारसायकलींचे अपघातही वाढले असून, अनेक जण किरकोळ जखमी झाले आहेत. ए ब्लॉकमधील जवळपास सर्वच अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. येथील इलेक्ट्रॉनिक झोनमध्येही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.महानगरपालिकेमध्ये पाणीपुरवठा एमआयडीसी करते व देखभाल महानगरपालिका करत असते. ए ब्लॉकचे हस्तांतर एमआयडीसीला करण्यात येणार असून, तेथील रस्ते बांधणीची जबाबदारीही त्यांच्याकडे जाणार आहे. परंतु अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया झाली नसल्यामुळे पालिका काम करीत नाही व एमआयडीसीही लक्ष देत नाही. दोन्ही संस्था जबाबदारी झटकत असल्यामुळे व्यावसायिक, कामगार व वाहतूकदारांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
ए ब्लॉक व इलेक्ट्रॉनिक झोनमधील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. या रस्त्यांवरून फक्त अवजड वाहनेच जाऊ शकतात अशी स्थिती झाली आहे. रस्ते बनविण्यासाठी आम्ही महानगरपालिकेकडेही पाठपुरावा करत असून आयुक्तांना भेटूनही ही समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.- एम. एम. ब्रह्मे, महाव्यवस्थापक, ठाणे - बेलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन (टीबीआयए)
महापे चौकीपासून ए ब्लॉकच्या जोडरस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मोटारसायकल या रोडवरून चालविता येत नसून वारंवार अपघात होत आहेत. रस्ते दुरुस्ती न केल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. - संजय शेलार, कामगार
हस्तांतर लवकर करण्याची मागणीए ब्लॉक हस्तांतरणाची प्रक्रिया रखडली आहे. या परिसरातील जवळपास १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे एमआयडीसी काँक्रिटीकरण करणार आहे. यासाठी हा विभाग लवकर हस्तांतर होणे आवश्यक आहे. जोपर्यंत हस्तांतरणाची प्रक्रिया होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.