मुंबई - गोवा महामार्गावर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:34 PM2020-06-02T23:34:58+5:302020-06-02T23:35:06+5:30
ओएनजीसी गेटजवळ नाला तुंबला : रस्ते विकास महामंडळाचे दुर्लक्ष; वाहनचालक त्रस्त
अरुणकुमार मेहत्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंबोली : ओएनजीसी गेटजवळ मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असलेला नाला तुंबल्याने सांडपाणी महामार्गावर वाहत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला असून परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. पनवेल शहरात येणाऱ्या मार्गिकेवर रस्त्याचे काम चालू आहे. तर दुसºया लेनवर पाणी वाहत असल्याने वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे. वारंवार होत असलेल्या त्रासामुळे चालकाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पनवेल शहरासह इतर भागात पावसाळीपूर्व नाले सफाईचे कामे सुरु आहेत. परंतू रस्ते विकास महामंळाकडून कामाला सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. महामार्गालगतचे नाले कचरा आणि मातीने भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे.
पनवेल येथील ओएनजीसी गेटजवळ महामार्गाच्या एका लेनचे काम चालू आहे. त्यामुळे पनवेल शहराकडे येणारी वाहतूक दुसºया लेनवरुन वळवण्यात आली आहे. त्यात महामार्गालगत असलेला नाला तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावरुन वाहत आहे. वाहत्या पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक मंदावली आहे. तसेच वाहतूक कोंडी सुध्दा होत आहे.
पाण्यातून ये-जा करणाºया दुचाकी घसरत असल्याने छोटे - मोठे अपघात घडत आहेत. सकाळ- संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असल्याने अर्धा तास याच कोंडीत जात आहे. दररोज वाहतूक ठप्प होत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्यातचा संताप वाहनचालक विनोद पवार यांनी व्यक्त केला.
महामार्गालगत पावसाळी नाल्याचा अभाव
कळंबोली सर्कल ते पळस्पे फाटापर्यंत महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पण रस्त्यालगत असलेले पावसाळी नाले बुजले आहेत. तर काही ठिकाणी नालेच नाहीत. ओएनजीसीजवळील रेल्वे पुलाखाली नाला तुंबला आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहते. याबाबत रस्ते विकास महामंडळाने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.