नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका मुख्यालयाशेजारील बेलापूर जंक्शन येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. या वाहतूककोंडीवर उपाय म्हणून उरण मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उरण फाट्याकडून उरणकडे जाणाऱ्या उड्डाणपूल बांधण्याच्या कामाला वेग आला असून हे काम पूर्ण झाल्यावर उरणकडून उरणफाटा या मार्गाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे बेलापूर जंक्शन येथील वाहतूककोंडीची समस्या संपणार आहे.
सीबीडी बेलापूर नोडला कार्यालयांचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या नोडमध्ये महापालिका, पोलीस, सिडकोची मुख्यालये, न्यायालय, कोकण भवन, विविध बँका, विविध खासगी आणि शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, हॉटेल आदी आहेत. त्यामुळे या नोडमध्ये विविध कामांसाठी नागरिकांची आणि वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महापालिकेच्या मुख्यालयाजवळील उरण रस्त्यावर जेएनपीटी बंदराकडे ये-जा करणाºया जड अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. तसेच या ठिकाणी सीबीडीकडून वाशीकडे पामबीच मार्गाने ये-जा करणाºया वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे बेलापूर जंक्शन येथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.
नवी मुंबई शहराला लागून नव्याने विकसित होत असलेला उलवे नोड आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यामुळे उरण रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढणार आहे. भविष्यात होणाºया वाहनांची वर्दळ लक्षात घेता या बेलापूर जंक्शन येथे उड्डाणपूल बांधणीचे काम सुरू आहे. सायन-पनवेल महामार्गावरून उरण जेएनपीटी बंदराकडे जाणाºया वाहनांसाठी हा उड्डाणपूल बांधण्यात येत असून या उड्डाणपुलामुळे जेएनपीटी बंदराकडे जाणारी जड अवजड वाहने बेलापूर जंक्शन येथील सिग्नलवर न थांबता उड्डाणपुलावरून जेएनपीटी बंदराकडे जाणार आहेत. उरणफाट्याकडून उरणच्या दिशेने जाणाºया उडडाणपुलाच्या एका मार्गीचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामाला वेग लावण्यात आला असून त्यानंतर उरणकडून उरणफाटा या दिशेने जाणाºया उड्डाणपुलाच्या दुसºया मार्गिकेचे काम सुरू करण्यात येणार आहे.
बेलापूर जंक्शन येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर दुसºया मार्गिकेचे काम सुरू करण्यात येणार आहे. एक मार्गिका सुरू झाल्यावर देखील वाहतूककोंडीची समस्या सुटेल.- बाबासाहेब तुपे, वाहतूक पोलीस निरीक्षक, बेलापूर