महामार्गावर चार तास वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:07 AM2017-08-03T02:07:58+5:302017-08-03T02:07:58+5:30
सायन - पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये टँकर पलटी झाल्यामुळे नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावर मानखुर्दमध्ये टँकर पलटी झाल्यामुळे नवी मुंबईतील सानपाड्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. जवळपास चार तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. खाडीपुलापासून साडेतीन किलोमीटरपर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या अपघातामुळे सकाळी मुंबईमध्ये नोकरी, व्यवसायासाठी जाणाºया नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. खाडीपुलापासून ते थेट सानपाडा सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नक्की काय झाले हे समजत नसल्याने अनेक वाहनधारकांनी वाशी रेल्वे स्टेशनकडून वाशी गावात व तेथून खाडीपुलाकडे जाण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी वाशी प्लाझापासून शिवाजी चौकातून सेक्टर ६ च्या भुयारी मार्गाचा वापर केला. परंतु दोन्हीकडून जाणाºया वाहनांना मार्गच न मिळाल्याने अंतर्गत रोडवरही वाहतूककोंडी झाली होती. कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
पोलिसांनी पुढे अपघात झाला असून टँकर बाजूला काढेपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही, वाहनधारकांसाठी ऐरोली वगळता दुसरा मार्ग नाही. यामुळे शक्यतो महामार्गावरच वाहने थांबवावी, वाशी गावच्या मार्गाचा वापर करू नये असे आवाहन केले. परंतु वाहनधारक ऐकण्याच्या स्थितीत नसल्याने वाहतूककोंडीमध्ये जास्तच भर पडली होती. साडेदहानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी दिली आहे.