सायन-पनवेल महामार्गावर चक्काजाम; नेरूळ उड्डाणपूल दुरूस्तीचा फटका! वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची गैरसोय
By नामदेव मोरे | Published: April 30, 2024 07:51 PM2024-04-30T19:51:29+5:302024-04-30T19:51:55+5:30
पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्प्याटप्प्याने काँकिटीकरण केले जात आहे.
नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन पनवेल महामार्गावरील नेरूळ उड्डाणपुलाची दुरूस्ती सुरू केली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी महामार्गावर चक्काजाम ची स्थिती निर्माण झाली होती. रोजच सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होवू लागली आहे.
पावसाळ्यात उड्डाणपुलांवर पडणा-या खड्यांमुळे वाहतूक कोंडी होते. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामुळे सर्व उड्डाणपुलांच्या पृष्ठभागाचे टप्याटप्याने काँक्रेटीकरण केले जात आहे. नेरूळमधील एल पी पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. यामुळे मुंबईकडे जाणारी एक मार्गीका बंद केली आहे. पर्यायी मार्गीका उलट दिशेला खुली केली आहे. यामुळे रोज सकाळी ७ ते १० व सायंकाळी पाच नंतर येथे वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी सायंकाळी उड्डाणपुलावर चक्काजाम झाले होते. पुलाच्या खालीही वाहतूक सुरळीत करताना वाहतूक पोलिसांची तारांबळ उडत आहे.
गर्दीच्या वेळेत पामबीच चा वापर करावा!
उड्डाणपुल दुरूस्तीचे काम पुर्ण होईपर्यंत महामार्गावर नेरूळ परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. यामुळे सकाळी कार्यालयात जाणा-या व सायंकाळी घरी जाणा-या कार व दुचाकीस्वारांनी पाम बीच रोडचा अवलंब केल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकते.