- सूर्यकांत वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : खासगी वाहनांमुळे शहरातील मुख्य मार्गावर वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. रस्त्यावर जागा भेटेल त्या ठिकाणी, पुलाखाली अथवा एसटीच्या बसथांब्यावर या खासगी वाहनांनी ताबा मिळवला आहे. यामुळे इतर वाहनचालकांसह सामान्य प्रवाशांना त्रास होत असतानाही आरटीओ, तसेच वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्यामागे अर्थपूर्ण कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.खासगी ट्रॅव्हल्सला टप्प्याने प्रवासी थांबे करण्याला व वसाहतीअंतर्गतच्या मार्गावर प्रवेशाला बंदी आहे. असे असतानाही नवी मुंबईत मात्र खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. शहरातील मुख्य रस्ते, तसेच वसाहतीअंतर्गतचे रस्ते त्यांना जनू आंदणच दिल्याचे भासत आहे. मुंबई, ठाणे येथून पुणे, सातारा अथवा कोल्हापूर येथे जाणारी खासगी वाहने नवी मुंबई मार्गेच जातात. दिवसाच्या तुलनेत रात्री चालवल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा त्यात सर्वाधिक समावेश आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्हा व तालुक्यात जाणाऱ्या अशा ट्रॅव्हल्सची संख्या शेकडोंच्या घरात आहे. या सर्वच ट्रॅव्हल्स ठाणे-बेलापूर मार्गे अथवा सायन-पनवेल मार्गाने जातात. मात्र, मुंबई अथवा ठाणे येथून प्रवासी घेऊन निघाल्यानंतर या ट्रॅव्हल्स प्रवाशांच्या शोधात नवी मुंबईत प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी थांबवल्या जातात. त्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे तलाव, कोपरखैरणे रेल्वेस्थानक या ठिकाणी, तर सायन-पनवेल मार्गावर वाशी पुलाखाली, सानपाडा पुलाखाली, नेरुळ, सीबीडी व कामोठे हे खासगी ट्रॅव्हल्सचे बेकायदेशीर थांबे बनले आहेत. त्याशिवाय पनवेल डेपोसमोरील पुलाखाली खांदा कॉलनीच्या मार्गावरही या ट्रॅव्हल्स थांबवल्या जातात. या सर्व ठिकाणी एका वेळी पाच ते दहा खासगी ट्रॅव्हल्स थांबत असल्यामुळे संपूर्ण मार्ग अडवला जाऊन, इतर वाहनांच्या मार्गात अडथळा होत आहे. यासंदर्भात अनेकांनी ठिकठिकाणी तक्रारीही केलेल्या आहेत. त्यानंतरही आरटीओ व वाहतूक पोलिसांकडून या अवैध प्रवासीवाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर एकदाही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच कोपरखैरणे व घणसोली नोडमध्येही ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे तयार होऊ लागले आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश नागरिक घणसोली व कोपरखैरणेत स्थायिक झालेले आहेत. त्यांना थेट गावापर्यंत प्रवासाची सुविधा देण्याच्या बहाण्याने त्यांच्याच परिचितांपैकी अनेकांनी ट्रॅव्हल्स सुरू केल्या आहेत. या ट्रॅव्हल्स रात्री ९ वाजल्यानंतर ठिकठिकाणी रस्त्यावर थांबत असल्याचे दिसत आहे. त्यात सतत रहदारी असलेल्या कोपरखैरणेतील तीन टाकी चौक, घणसोलीतील सिम्पलेक्स चौक या ठिकाणांचा समावेश आहे.