धूलिवंदनामुळे महामार्गावरील वाहतूकही रोडावली; वाहतूक बंद असल्याचे हवा गुणवत्तेत वाढ
By नामदेव मोरे | Published: March 25, 2024 04:32 PM2024-03-25T16:32:59+5:302024-03-25T16:33:14+5:30
होळी व धूलिवंदनमुळे शनिवार ते सोमवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी शुक्रवारपासूनच गावाकडे रवाना झाले आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती.
नवी मुंबई : धूूलिवंदनला पहाटेपासून सुरू झालेल्या रंगोत्सवामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या. सर्वच नागरिक सुट्टीचा आनंद घेत असल्यामुळे सायन - पनवेल महामार्गासह सर्व प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. प्रमुख रस्त्यांवरही तुरळक प्रमाणात वाहतूक दिसत होती.
होळी व धूलिवंदनमुळे शनिवार ते सोमवार तीन दिवस सुट्टी असल्यामुळे हजारो चाकरमानी शुक्रवारपासूनच गावाकडे रवाना झाले आहेत. सलग सुट्यांमुळे पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्याही मोठी होती. सोमवारी मुंबई, नवी मुंबई परिसरातील बहुतांश सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पहाटेपासून सर्वच नागरिक रंगोत्सवाचा आनंद घेत असल्यामुळे शहरातील इतर सर्व बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या होत्या. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर स्पष्टपणे दिसत होता. सायन - पनवेल महामार्ग, ठाणे - बेलापूर रोड, पाम बीच रोड, पनवेल - उरण, पनवेल - गोवा या प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक रोडावली होती. सायन - पनवेल महामार्गावर दुपारी अत्यंक कमी वाहने पाहावयास मिळाली. अंतर्गत रस्त्यांवरही वाहतूक कमी होती.
रोडवरील वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणही कमी झाले होते. सर्वच विभागांतील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये सुधारणा झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. नागरिकांना प्रदूषणविरहित श्वास घेणे शक्य झाले होते.
शहरातील विभागनिहाय हवा गुणवत्ता निर्देशांक
विभाग - निर्देशांक
वाशी १३०
महापे १०२
नेरूळ १०९
कळंबोली ८९
तळोजा ११५