बेकायदा पार्किंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:00 AM2020-02-19T02:00:31+5:302020-02-19T02:00:37+5:30
नेरूळमधील प्रकार : कारवाईचे नागरिकांकडून स्वागत
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात वाहने पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला असून रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी नेरूळ विभागात वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. बेकायदा पार्किंगसह वाहतुकीचे नियम मोडणाºया वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे.
नवी मुंबई शहरात वाहने पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली असून वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जात आहेत, त्यामुळे वाहतूककोंडीच्या समस्यांमध्ये वाढ झाली असून अपघातदेखील घडत आहेत. नेरूळ आणि सीवूड भागात नागरिक आणि वाहनांची वर्दळ असलेल्या रेल्वे स्थानक, मार्केट आदी ठिकाणी सम-विषम पार्किंग, नो पार्किंग, समांतर पार्किंग आदींचे फलक लावण्यात आले आहेत, तरीदेखील नियमांचे उल्लंघन करून वाहने पार्किंग केली जात आहेत. नेरूळ सेक्टर २ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाच्या शेजारील अरु ंद रस्त्यावरून वाहने, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ आहे. या रस्त्याच्या शेजारी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर उभी केली जात आहेत. यामुळे वाहतूककोंडीबरोबर अपघाताच्या घटना देखील घडल्या आहेत. सीवूड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय यादव, नितीन वडाळ आदींच्या पथकाने नेरूळ सेक्टर २ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळील रस्त्याच्या कडेला बेकायदा पार्किंग केल्या जाणाºया वाहनांवर कारवाई केली. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी अशा कारवाया सातत्याने करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.