पनवेल : नो पार्किंगमध्ये वाहन पार्क केलेल्यांवर कारवाई करण्यासाठी नवीन पनवेल व पनवेल शहरात टोइंग व्हॅन तैनात करण्यात आली आहे, तसेच चारचाकी गाड्यांना जामर लावले जात आहे. मात्र, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातील काही जामर चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे.पनवेल परिसरात अनेक दुचाकी गाड्या, चारचाकी गाड्या नो पार्किंग क्षेत्रात लावल्या जातात. त्यांच्यावर टोइंग व्हॅनद्वारे कारवाई करण्यात येते, तर चारचाकी गाड्यांना जामर लावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येतो. मात्र, हे जामर चोरीला जाऊ लागल्याचे प्रकार पनवेल शहरात घडू लागले आहेत. चारचाकी गाडीला जामर लावल्यानंतर गाडीचालक गाडीचे चाक बदलून त्याजागी दुसरे चाक लावून जामर चोरून नेऊ लागले आहेत. गेल्या महिनाभरात पाच जामर चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कार व टेम्पोला हे जामर लावण्यात येत आहेत.टोइंग व्हॅनवरील जामर चोरीला गेल्याने जामरांची संख्याही कमी झाली आहे. वाहतूक शाखेच्या पनवेल येथील टोइंग व्हॅनकडे एकूण २० ते २२ जामर होते. मात्र, यातील पाच जामर चोरीला गेल्यामुळे त्यांच्याकडे केवळ १५ जामर राहिलेले आहेत. या टोइंग व्हॅनवर दोन वाहतूक पोलीस कार्यरत असून, १० ते १२ तरुण मुले काम करत आहेत. मात्र, जामरच चोरीला जाऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनाविचारले असता, जामर चोरून नेणाऱ्याविरोधात गुन्हे दाखलकरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांचे जॅमर चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 3:00 AM