वाहतूक पोलिसाला ट्रकने उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:50 PM2019-08-30T23:50:40+5:302019-08-30T23:51:53+5:30
उरणमधील घटना : पोलिसांनी चालकाला केली अटक
उरण : कर्तव्यावर असताना वाहनचालकाकडे पडताळणीसाठी कागदपत्रे मागितल्याने माथेफिरू चालकाने ट्रकच वाहतूक शाखेच्या शिपायांच्या अंगावर घातल्याचा प्रकार शुक्र वारी उरण - जेएनपीटी टी जंक्शन मार्गावर घडला. या गंभीर घटनेत वाहतूक पोलीस नितीन शिरसागर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाशी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी ट्रकचालक गलाराम नाजरीराम याला अटक करण्यात आली असून ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती उरण वाहतूक नियंत्रण शाखेचे वपोनि माणिक नलावडे यांनी दिली. उरण - जेएनपीटी टी जंक्शन मार्गावर नितीन शिरसागर हे कर्तव्यावर होते. सकाळी दहा वाजताच्या सुमारास एका ट्रकला थांबवून वाहन चालकाकडे कागदपत्रे पडताळणीसाठी मागितली. मात्र माथेफिरू चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामुळे शिरसागर यांच्या मानेला, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.
नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कारवाई करणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालणे त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी वाशीमध्ये झोमॅटो कंपनीच्या महिला कर्मचाºयाने वाहतूक पोलिसांना अपशब्द वापरून तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकला होता. यानंतर उरणमध्ये ट्रकने पोलिसाला धडक दिल्याची घटना घडली आहे. अशाप्रकारे शासकीय कामकाजामध्ये अडथळे निर्माण करणाºया व मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.