पाताळगंगा नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 11:06 PM2019-12-08T23:06:34+5:302019-12-08T23:07:00+5:30
रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता.
रसायनी : रसायनीतील पाताळगंगा पूल हा १९८० ज्या दशकात पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात मोठमोठ्या कंपन्या उदयास आल्यानंतर बांधण्यात आला होता. यामुळे येथील सततच्या अवजड वाहतुकीमुळे पुलावर खड्डे पडून मोठी दुरवस्था झाली होती. यामुळे या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेतले होते. त्या नवीन पुलाचे काम आता पूर्ण झाले असून येथून वाहतूक सुरू झाली आहे; तर जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पाताळगंगेवरील पुलामुळे आताचे जुने औद्योगिक क्षेत्र व नदीपलीकडील वडगांव, वाशिवली, लोहोप, बोरीवली, कैरे ही गावे जोडली गेली. सन २०१२-१४ पासून अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात आणखी काही कंपन्या सुरू झाल्या. यामुळेया अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात कंपन्यांबरोबरच परिसरात चावणे, सवणे, कासप, कालिवली, जांभिवली, कराडे खुर्द व कराडे बुद्रुक व तीन-चार आदिवासीवाड्या यांना दळणवळणासाठी याच पुलाचा उपयोग होतो.
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या अवजड वाहतुकीमुळे जुन्या पुलावर ताण येऊ लागला. यामुळे जुन्या पुलावर वारंवार खड्डे पडणे, जोडाच्या ठिकाणी लोखंडी अँगल वर येणे, यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या पुलावरून प्रवास करणे धोक्याचे ठरत होते; यामुळे कारखानदार आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. खड्डे भरणे, डांबरीकरण करणे हे होतच होते. त्याबरोबर या पुलावरील ताण कमी करण्यासाठी नव्या पुलाची गरजही निर्माण झाली होती.
रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या या औद्योगिक क्षेत्रात एमआयडीसीने पराडा कार्नर ते सिद्देश्वरी कार्नरपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व चौपदरी काँक्रीटचा रस्ता चार वर्षांपूर्वीच केला आहे.
जुन्या पुलाची डागडुजी
मागील सव्वा वर्षापासून जुन्या पुलाला जोडून नवीन पूल बांधण्याचे काम चालू होते. ते आता पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. त्यामुळे आता जुन्या पुलाच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. यामुळे वाहनचालक व संबंधित गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.