नवी मुंबई : सीवूड रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला मॉल समोर मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. या वाहनांमुळे वाहतूककोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ट्राफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे नो पार्किंग क्षेत्रात वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. सततच्या कारवायांमुळे वाहनचालकांनाही शिस्त लागत असून वाहनांचे प्रमाण कमी झाले आहे.
सीवूड रेल्वेस्थानकामधील मॉलमुळे स्थानकाबाहेरील रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्र असतानाही मोठ्या प्रमाणावर वाहने पार्किंग केली जातात, त्यामुळे स्थानकात ये-जा करणाºया रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच या भागातून वाहनांची वर्दळदेखील मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या आलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीच्या समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत. वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून या वाहनांवर कारवाई केली जाते; परंतु मनुष्यबळ कमी असल्याने सातत्याने कारवाया करताना अडचणी निर्माण होत आहेत. या भागातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून तीन ट्राफिक वार्डनची नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्राफिक वार्डनच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या बाहेर असलेल्या नो पार्किंग क्षेत्रात वाहने उभी केल्यास वाहनजॅमर लावून कारवाया केल्या जात आहेत. दररोज कारवाया होत असल्याने या स्थानकावरील रस्त्यांच्या कडेला बेकायदेशीरपणे वाहने उभे करण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे.