वाशीत वसाहतीअंतर्गत वाहतूककोंडी
By admin | Published: November 12, 2015 01:36 AM2015-11-12T01:36:31+5:302015-11-12T01:36:31+5:30
वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे.
नवी मुंबई : वसाहतीअंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे ही परिस्थिती ओढावल्याचे दिसून आले आहे. रविवारी वाशी विभागातील बहुतांशी अंतर्गत रस्त्यांवर वाहनांचा चक्का जाम झाल्याचे पाहावयास मिळाले. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.
नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईत पार्किंगचे नियोजन पूर्णत: फसले आहे. त्यामुळे जागा मिळेल तेथे वाहने पार्क केली जातात. याचा फटका वाहतूक व्यवस्थेला बसल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. पार्किंगच्या सुविधा नसल्याने बहुतांशी रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क केली जात आहेत. विशेषत: वसाहतीअंतर्गत रस्त्यांना तर पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहनधारक आपल्या गाड्या पार्क करीत असल्याने याचा फटका वाहतूक यंत्रणेला बसला आहे. बेकायदा वाहन पार्किंगमुळे या रस्त्यांवरून स्कूल बस, रुग्णवाहिका, रिक्षा आदी वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. काही भागात तर दुचाकींचीही कोंडी होताना दिसत आहे. वाशी सेक्टर ९, १०, सेक्टर १५ व १६ या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी होते.
रविवारी अशाचप्रकारे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने या परिसरातील संपूर्ण रस्त्यांवर चक्का जाम झाल्याचे दिसून आले. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे परिसरातील सेक्टर १९ आणि माथाडी वसाहतीतील रस्त्यांवर सुध्दा दोन्ही बाजूने वाहने उभी केली
जातात.
त्यामुळे अगोदरच अरुंद असलेले हे रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने कुचकामी ठरले आहेत. शहरातील ऐरोली, घणसोली, सानपाडा, नेरूळ व सीबीडी या परिसरातील अशीच परिस्थिती निर्माण झाल्याचे पाहावयास मिळते.
त्यामुळे रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली असून रस्त्यावरील बेकायदा वाहन पार्किंगला आळा घालण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)