नवी मुंबई : पनवेलमध्ये मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना अटक करून १५ लाख रुपये किमतीच्या सापाची सुटका केली आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गणेश पद्माकर पाटील (राहणार दादर, तालुका पेण, रायगड) नीलेश जनार्दन बाइंग (राहणार करंजा, उरण) व आविष्कार गणेश म्हात्रे (कडापे गाव, उरण) यांचा समावेश आहे.
मांडूळ सापामुळे धनदौलत व ऐश्वर्य प्राप्त होते, अशी अनेकांची श्रद्धा आहे. यामुळे या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. २५ आॅगस्टला पनवेल एसटी डेपोच्या मागील बाजूला सर्व्हिस रोडवर तीन जण सापाची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अनिल सुरवसे यांना मिळाली होती. गुन्हे शाखा युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवसे, सुनील सावंत, वनविभागाचे सिद्धेश अभिमान मोराळे व सुभाष किशोर राठोड यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँड परिसरामध्ये सापळा रचला होता. ७.३० वाजण्याच्या सुमारास येथील पाण्याच्या टाकीजवळ तीन जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यापैकी गणेश पाटीलकडील बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये अडीच किलो वजनाचा व ४३ इंच लांबीचा मांडूळ साप आढळून आला. १५ लाख रुपयांना हा साप विकण्यात येणार होता, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.तिघांविरोधात बेकायदेशीरपणे साप पकडून त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.