रिक्षाचालकांकडून रेल्वेप्रवाशांची अडवणूक; वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 12:12 AM2020-02-07T00:12:34+5:302020-02-07T00:12:56+5:30
आरटीओचे दुर्लक्ष
नवी मुंबई : शहरातील रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर रिक्षाचालक प्रवाशांवर अरोरावी करीत असून रस्त्यातच उभ्या असलेल्या रिक्षाचालकांमुळे स्थानकात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघनही होत असून, स्थानकाबाहेरील रस्त्यावर रिक्षा उभ्या करून रस्ता अडवला जात आहे. यामुळे वाहतूककोंडीची समस्याही उद्भवते. या प्रकाराकडे आरटीओचे आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
२१ व्या शतकातील शहर म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई शहरात शहराला साजेशा रेल्वेस्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. स्थानकाबाहेर वाहन पार्किंग, रिक्षा, टॅक्सी स्टॅण्डचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कामानिमित्त शहरातील आणि शहराबाहेरील हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करून शहरातील विविध भागात ये-जा करतात. स्थानकांच्या बाहेर बेकायदा रिक्षास्टॅण्डची संख्या वाढली असून, यामुळे रेल्वे प्रवाशांना वाहने पार्किंग करताना विविध अडचणी निर्माण होत आहेत.
नेरुळ, जुईनगर, सानपाडा, तुर्भे आदी रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर अनेक रिक्षाचालक रिक्षा उभ्या करीत असून, प्रवेशद्वारावर येऊन प्रवाशांना रिक्षाने प्रवास करायचा आहे का, याची विचारणा करीत आहेत. स्थानकाबाहेर उभ्या केल्या जाणाऱ्या रिक्षांमुळे वाहतूककोंडी होत असून, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची वाट अडवली जात असल्याने वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत.
रिक्षाचालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. स्थानकाबाहेर रिक्षाचालकांकडून होणाºया अरेरावीमुळे प्रवासी त्रस्त असून, याबाबत कारवाई करण्याची मागणी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडे करण्यात येत आहे.