ट्रेलर चालकाला लुटणारी टोळी गजाआड
By admin | Published: August 28, 2015 11:37 PM2015-08-28T23:37:22+5:302015-08-28T23:37:22+5:30
ट्रेलर चालकाला लुटून पळालेल्या टोळीला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
नवी मुंबई : ट्रेलर चालकाला लुटून पळालेल्या टोळीला तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यामध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. गुन्हा करून पळताना पडलेल्या त्यांच्या दुचाकीच्या चावीवरून पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे.
बुधवारी पहाटे तुर्भे स्टोअर येथे हा प्रकार घडला होता. उरण येथून सुरतला ट्रेलर घेवून चाललेल्या प्रदीपकुमार पटेल (३०) यांना मारहाण करून सहा जणांनी त्यांच्याकडील मोबाइल व २७ हजार रुपयांची रक्कम लुटली होती. गुन्ह्याच्या तपासाकरिता वरिष्ठ निरीक्षक चंद्रसेन देशमुख यांनी सहाय्यक निरीक्षक कैलास वाघ, गणेश भामरे, उपनिरीक्षक बबन इलग, दत्तात्रय भोर यांचे पथक तयार केले होते. या पथकाला तपासादरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर झाडीमध्ये बेवारस दुचाकी(एमएच ०३ बीएल ३७४९) पोलिसांना आढळली. ही चावी त्या दुचाकीला लावली असता ती चालू झाली. यावरून दुचाकीमालक मोहम्मद शेख यांचा पोलिसांनी शोध घेतला. परंतु मेहुण्याने दुचाकी नेल्याचे त्यांनी सांगताच पोलिसांनी प्रवीण आंधळेला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून एकूण सहा जणांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीण आंधळे (२३), सैफअली सैयद (२१), प्रशांत तळगोंडा (२१), नितीन येवले (२२), राम बेलकर (२७) व ज्ञानेश्वर गुंड (३०) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व जण उरण व मुंबई परिसरातले राहणारे आहेत. प्रशांत व सैयद हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी असून प्रवीणचे मित्र आहेत. घटनेच्या दिवशी ते प्रवीणला भेटायला उरणला आले होते. त्याचवेळी प्रवीणच्या ओळखीचे राम, ज्ञानेश्वर व नितीन तिथे आले. रिंकी ढाब्यावर जेवण केल्यानंतर खर्चाच्या पैशासाठी त्यांनी एखाद्या चालकाला लुटण्याचा कट रचला. (प्रतिनिधी)