सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - कारशेड वरून नेरुळ रेल्वेस्थानकात जाणाऱ्या रेल्वेने बसला धडक दिल्याची घटना जुईनगर येथे घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून बसचे नुकसान झाले आहे.
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुईनगर येथे रेल्वे रूळ क्रॉसिंगच्या ठिकाणी हा अपघात घडला. सदर रेल्वेरूळ हा सानपाडा येथेही कारशेड ला रेल्वे नेण्यासाठी वापरला जातो. मात्र त्याठिकाणी फाटक नसल्याने रेल्वे येत असतानाही वाहनांची रहदारी सुरु असते. यामुळे यापूर्वी देखील त्याठिकाणी अपघाताच्या घटना घडल्या आहेत.
शनिवारी दुपारी कारशेड मधून निघालेली रिकामी लोकल नेरुळ स्थानकाच्या दिशेने चालली होती. यावेळी रूळ ओलांडणाऱ्या एनएमएमटी बसला रेल्वेची धडक बसली. त्यामुळे बसचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी गजानन लाखे यांनीं सांगितले. या दुर्घटनेमुळे त्याठिकाणी जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. त्याठिकाणी फाटक बसवावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. त्यानंतरही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत.