मुंबई - हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्याने कार्यालय गाठणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. लोकलच्या पेंटाग्राफवर अज्ञाताने बॅग फेकल्यानं पेंटाग्राफला ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही दिशेने जाणाऱ्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या.
अज्ञात व्यक्तीने रेल्वे लोकलच्या पेंटाग्राफवर बॅग फेकल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत असून सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यात येत आहे. अनेकदा लोकलवर दगड फेकणे आणि अशा घडणाऱ्या प्रकारांमुळे सध्या पोलिसांनी रेल्वे मार्गावर गस्त घालण्यास सुरूवात केली आहे.
वाशी रेल्वे स्थानकात असलेल्या लोकलच्या पेंटाग्राफने अचानक पेट घेतल्याची घटना आज सकाळी घडली. आग लागल्यानंतर सगळीकडे धूर पसरल्याने रेल्वे स्थानकात प्रवाश्यांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्वरित ही आग नियंत्रणात आणली आणि गाडी कारशेडमध्ये रवाना केली. या प्रकारामुळे हार्बर मार्गावरील वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले.