नवी मुंबई : शहरातील उद्यानांची योग्य पद्धतीने देखभाल करता यावी, यासाठी महापालिकेने २५० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. उद्यानांची निगा कशी राखावी, सुशोभीकरणासाठी काय करावे, याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
नवी मुंबई उद्यानांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. १०८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तब्बल २०० पेक्षा जास्त उद्याने विकसित करण्यात आली आहेत. याशिवाय दुभाजक, उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्यांखालीही हिरवळ विकसित केली आहे. उद्यानांची देखभाल योग्य पद्धतीने करता यावी, यासाठी कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केली होती.
उद्यान विभागाचे उपआयुक्त नितीन काळे यांनी शनिवारी नेरुळ सेक्टर २१ मधील रॉक गार्डनमध्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये २५० कर्मचाºयांनी सहभाग घेतला होता. डॉ. व्ही. ए. रोडे, राजेश सुंदरराजन यांनी कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षणामुळे भविष्यात चांगल्या पद्धतीने उद्यानांची देखभाल करणे शक्य होणार असून चांगली उद्याने तयार करणे शक्य होणार असल्याचे काळे यांनी व्यक्त केला.