महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:30 PM2019-10-14T23:30:07+5:302019-10-14T23:30:18+5:30

विधानसभेच्या प्रचारात इच्छुकांची आघाडी : प्रभागातील मताधिक्यावर ठरणार उमेदवारी

training of municipal elections started | महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम

महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम

googlenewsNext

नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीनिमित्त महापालिका निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे. या निवडणुकीमध्ये प्रभागामध्ये मताधिक्य देणाऱ्यांना पालिका निवडणुकीचे तिकीट दिले जाणार आहे. यामुळे इच्छुकांनी प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.


नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एप्रिल, २०२० मध्ये होणार आहे. फेब्रुवारी अखेरीस यासाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपासूनच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्थानिक पातळीवर नगरसेवक व इतर पदाधिकारी प्रचारामध्ये फारसे सहभागी झाले नसल्याचे पाहावयास मिळाले, परंतु विधानसभेची निवडणूक मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातामध्ये घेतल्याचे पाहावयास मिळत आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसह मनसेचेही प्रभागामधील कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या उमेदवाराची पत्रके प्रत्यक्षात घरोघरी वाटली जात आहेत.

समाजमाध्यमांवरून छायाचित्रांसह उमेदवाराचा प्रचार केला जात आहे. हा प्रचार करताना उमेदवारासोबत स्वत:ची प्रतिमा व भूमिकाही नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. उमेदवार सोबत नसतानाही अनेक पदाधिकारी प्रत्येक घरी जाऊन प्रचार करत आहेत. रॅली व सभांमधील उपस्थितीही वाढली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी नवी मुंबईमधील राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वगळून इतर सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते व गणेश नाईक समर्थक कार्यकर्ते यांनीही ऐरोली व बेलापूर दोन्ही मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. भाजपमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची संख्याही वाढली असून, कार्यकर्त्यांमध्येच प्रचारासाठी चुरस सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शिवसेना व भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी प्रभागनिहाय मतदानाचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षणामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या प्रभागांमधूनही शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे धक्का बसलेल्या नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्यासाठीचा आग्रह माजी मंत्री गणेश नाईकांकडे धरला होता. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतरही प्रत्येक प्रभागनिहाय मतदानाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जे मताधिक्य देतील, त्यांनाच उमेदवारी देण्यात येणार असल्याचे नेत्यांनीही स्पष्ट केले आहे. कोण मताधिक्य देणार, यावर लक्ष देत आहोत. आत्ता दगाबाजी केली किंवा प्रचाराकडे दुर्लक्ष केल्यास महापालिका निवडणुकीमध्ये सहकार्य केले जाणार नाही, असेही काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट केले आहे. यामुळे सुरुवातीच्या काळात प्रचाराकडे दुर्लक्ष करणारे कार्यकर्ते या आठवड्यात सक्रिय झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
प्रभागामधून मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीयांची धडपड सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.


शिवसेनेतील नाराजी
विधानसभेचे दोन्ही मतदार संघ भाजपसाठी सोडल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. एकही मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आलेला नाही. यामुळे पदाधिकाºयांना पालिका निवडणुकीसाठी आपली ताकद अजमावून पाहण्याची संधीच मिळालेली नाही. दोन्ही आमदार भाजपचे झाल्यामुळे शिवसेनेलाही गळती लागण्याची भीती अनेकांना वाटू लागली असल्यामुळे एकतरी मतदार संघ मिळावा, यासाठी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
पदाधिकाºयांमध्ये तीव्र स्पर्धा
भारतीय जनता पक्षामध्ये अगोदरचे पदाधिकारी व माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत आलेले नगरसेवक व पदाधिकारी यांच्यामध्ये प्रभागांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्रही पाहावयास मिळत आहे. नवे व जुने दोन्ही पदाधिकारी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचार करत असल्याचेही चित्र पाहावयास मिळत आहे.
दगाबाजी सहन होणार नाही
विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशी दगाबाजी केली जाण्याची शक्यता आहे. काही नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी प्रचारात मनापासून सहभागी होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. यामुळे दगाबाजी सहन केली जाणार नाही. प्रचाराकडे लक्ष न देणाºयांना महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सहकार्य केले जाणार नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केल्यामुळे सुरुवातीला प्रचारात सहभागी नसलेले अचानक उत्साहाने प्रचार करू लागले आहेत.

Web Title: training of municipal elections started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.