ट्रायच्या नव्या धोरणात ग्राहकांसह केबलचालकांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 03:54 AM2018-12-18T03:54:57+5:302018-12-18T03:55:24+5:30
केबलसेनेचा आंदोलनाचा इशारा : कमी पैसे हा केवळ आभास
अजित मांडके
ठाणे : नव्या वर्षात आता ग्राहकांना आपल्या आवडीचे चॅनल पाहण्याची आणि जेवढे चॅनल पाहतो, त्याचेच पैसे देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. परंतु, हा केवळ आभास असून यामध्ये ग्राहक आणि केबलचालकांचे कंबरडे मोडणार असल्याचा आरोप ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. ट्रायच्या या नव्या धोरणानुसार केबल आॅपरेटरला केवळ १० टक्केच नफा मिळणार असून आलेल्या उत्पन्नातून कामगारांचे पगार, तांत्रिक दुरुस्तीची कामे करणे अवघड होणार आहे. शिवाय, ग्राहकांना कमी खर्चात चॅनल मिळणार असल्याचे बोलले जात असले तरीसुद्धा बेसिक चॅनलसाठीच ग्राहकांच्या खिशाला ४५० रुपयांपर्यंत भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायने याचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा नव्या वर्षात सर्वच केबल आॅपरेटर आंदोलन करतील, असा इशाराही केबलसेनेने दिला.
येत्या १ जानेवारीपासून ग्राहकांना आपल्या आवडीच्या वाहिन्या बघण्याची संधी मिळणार आहे. सध्या ठाणे किंवा इतर ठिकाणांचा विचार केल्यास या भागांमध्ये केबल आॅपरेटर मोठ्या संख्येने कार्यरत आहेत. केवळ ठाण्यातच ३५० च्या आसपास केबल आॅपरेटर असून त्यामध्ये एक हजारांच्या आसपास कामगार काम करत आहेत. ठाण्यात केबल ग्राहकांचे दोन लाखांच्या आसपास जाळे पसरले आहे. त्यामुळे या दोन लाख ग्राहकांना या नव्या धोरणाचा फायदा होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु, या नव्या धोरणानुसार केवळ ग्राहकांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचाच प्रयत्न असल्याचा दावा ठाणे जिल्हा केबलसेनेने केला आहे. या नव्या धोरणानुसार प्रत्येक ग्राहकाला फ्री टू एअर चॅनल घेतल्यावरच पॅकेजमधील चॅनल पाहण्याची संधी मिळणार आहे. परंतु, यासाठी १३० रुपये ग्राहकाला मोजावे लागणार आहेत. जे काही पॅकेज निवडले जाईल, त्यासाठी पुन्हा २५० रुपयांच्या आसपास पैसे मोजावे लागणार आहेत.
नवे धोरण ग्राहकांना नुकसानकारक
सध्या कोणतेही पॅकेज नसताना सर्व चॅनलसाठी ग्राहकांना ३०० पासून ते ४५० रुपये मोजावे लागत आहेत. परंतु, आता नव्या धोरणानुसार जास्त पैसे ग्राहकांना मोजावे लागणार असून केबल आॅपरेटरचेही नुकसान असल्याचे मत सेनेने व्यक्त केले आहे. केबल आॅपरेटरला यामधून केवळ १० टक्केच कमिशन मिळणार आहे, तर फ्री टू एअर वाहिन्यांमधून ५० टक्के कमिशन मिळणार आहे. परंतु, ते कमिशन असून नसल्यासारखेच असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. कारण, जे १० टक्के कमिशन मिळणार आहे, त्यातून कामगारांचे पगार द्यायचे, तांत्रिक दुरुस्तीची कामे करायची, नवीन तंत्रज्ञान विकसित होत असते, त्याचा खर्च भागवायचा कसा, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
चारच दिवसांपूर्वी ट्रायच्या सदस्यांसमवेत ठाण्यातील केबल आॅपरेटरची चर्चा झालेली आहे. या चर्चेत आम्ही समस्या ठेवल्या आहेत. कमीतकमी ४० टक्के कमिशन मिळावे, अशी मागणी केली आहे. परंतु, यावर योग्य तो तोडगा निघाला नाही, रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.
- मंगेश वाळुंज,
अध्यक्ष, ठाणे जिल्हा केबलसेना
ट्रायच्या नव्या धोरणांमुळे केबल चार्जेसमध्ये होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकाच्या खिशाला अधिक कात्री लागणार आहे. करमणूक शुल्क तर घेतले जातेच. आता त्यावर जीएसटीही आकारला जाणार आहे. ग्राहकाला मोफत तर नाहीच, मात्र परवडेल अशा किमतीतही आता काही मिळत नाही.
- गणेश जोशी, राष्टÑीय अध्यक्ष,
ग्राहक संरक्षण सेवा समिती