ऐरोलीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने ट्रान्स हार्बर ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 01:14 AM2018-07-01T01:14:33+5:302018-07-01T01:14:49+5:30
ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
नवी मुंबई : ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रस्तावित दिघा स्थानकालगत शनिवारी दुपारी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटली. यामुळे तीन तास दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी, ठाणे ते वाशी, नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर अनेक प्रवाशांनी पर्यायी वाहतूक मार्गाने आपले इच्छीतस्थळ गाठले.
शनिवारी दुपारी ऐरोली स्थानकातून निघालेली लोकल प्रस्तावित दिघा स्थानकालगत आली असता, त्या ठिकाणी रेल्वेची ओव्हरहेड वायर तुटल्याचे निदर्शनास आले. यामुळे या लोकलसह त्यामागून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या सर्वच लोकल थांबविण्यात आल्या होत्या. परंतु यापूर्वीही त्या ठिकाणी ओव्हरहेड वायर तुटल्याचा प्रकार घडलेला होता. त्यामुळे दुरुस्ती कामाचा कालावधी वाढल्याने ठाणे-वाशी, नेरूळ मार्गावरील दुतर्फा वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांना अर्ध्या प्रवासातून पायपीट करावी लागली. रेल्वेचा खोळंबा लक्षात घेऊन एनएमएमटीने ठाणे-बेलापूर मार्गावर जादा बस सोडून त्यांच्या फेºया वाढवल्या होत्या, त्यामुळे बहुतांश प्रवाशांना प्रवासाचा निश्चित टप्पा गाठता आल्याने त्यांना दिलासा मिळाला.
अखेर दुपारी अडीचनंतर दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.