स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर विस्कळीत, ट्रेनमधून उतरून प्रवाशांनी गाठले स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:43 AM2017-10-31T00:43:21+5:302017-10-31T00:43:33+5:30
रेल्वे रुळांना जोडणारी स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.
नवी मुंबई : रेल्वे रुळांना जोडणारी स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. अनेकांनी रखडलेल्या ट्रेनमधून उतरून स्थानक गाठले. तासाभरानंतर ठाणे-वाशी वाहतूक पूर्ववत झाली.
रबाळे ते ऐरोली स्थानकांदरम्यान सोमवारी संध्याकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन रुळांना जोडणाºया स्लीपरचा काही भाग तुटलेला असल्याचे ठाण्याच्या दिशेने जाणाºया लोकलच्या मोटरमनच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी रेल्वे थांबवून सदर प्रकाराची माहिती तांत्रिक दुरुस्ती विभागाला दिली. त्यानुसार रेल्वेच्या कामगारांनी त्या ठिकाणी जाऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. ही बाब वेळीच निदर्शनास आल्यामुळे रेल्वेची संभाव्य दुर्घटना टळली.
या दुरुस्ती कामादरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती. परिणामी, ऐन संध्याकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली, काही महिलांनी तर थांबलेल्या ट्रेनमधून उतरून स्थानक गाठले. अखेर दुरुस्तीचे काम संपल्यानंतर सुमारे एक तासानंतर पावणेसात वाजताच्या दरम्यान रेल्वे वाहतूक सुरळीत झाली.