नवी मुंबई: ऐरोली ते घणसोली दरम्यान रेल्वेच्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्याने शुक्रवारी दुपारी ट्रान्स हार्बर ठप्प झाली होती. पर्यायी रेल्वे प्रवास्यांना इतर मार्गाचा वापर करावा लागला. तर अचानक घडलेल्या हा घटनेमुळे रेल्वेप्रवास्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. ट्रान्स हार्बर मार्गावरील घणसोली ते ऐरोली दरम्यान विद्युत पुरवठ्यात बिघाड झाला. यामुळे दोन्ही मार्गावरील रेल्वे प्रभावित होऊन वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रेल्वेच्या एकापाठोपाठ एक रांगा लागल्या होत्या. मात्र झालेला बिघाड दुरुस्त करण्यात बराच कालावधी लागल्याने रेल्वेप्रवासी रेल्वेतच अडकून पडले होते.
अखेर काही प्रवास्यांनी रेल्वेतून उतरून ठाणे बेलापूर मार्गावरून बस, खासगी वाहनांच्या आधारे निश्चित ठिकाणी धाव घ्यावी लागली. दुपारी साडेतीनच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर रेल्वे पुन्हा रुळावर आली. मात्र पुढील काहीवेळ धीम्या गतीनेच लोकल धावत होत्या. अचानक झालेल्या या बिघाडामुळे ठाणे ते वाशी व नेरुळ या मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवास्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.