- वैभव गायकरपनवेल : पनवेलमध्ये मागील वर्षभरापासून खासगी आधार केंद्र शासकीय कार्यालयात स्थलांतरित करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची उदासीनता दिसून येत आहे. पालिकेच्या माध्यमातून आधार केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करूनही आधार केंद्रांची यादी देण्यास जिल्हाधिकारी कार्यालय टाळाटाळ करीत असल्याने आधार केंद्राअभावी पनवेलकरांचे हाल होत आहेत.शासनाने खासगी ठिकाणी चालू असलेले आधारसंच शासकीय कार्यालयात स्थलांतरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाला करण्यात आल्या होत्या. या सूचनेनुसार २०१८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तहसील, पंचायत समिती, महानगरपालिका यांच्यांशी पत्रव्यवहार करून आधारसंचासाठी आपल्या कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्याकरिता पत्रव्यवहार करण्यात आले आहे. यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयांशी समन्वय साधून आधार केंद्र सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, जागा उपलब्ध करून पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पनवेलमधील आधार केंद्राची यादी मागविली आहे. मात्र, वर्षभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पालिकेला यादी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शासकीय कार्यालयात आधार केंद्र सुरू झाल्यास पालिका क्षेत्रातील रहिवाशांना त्याचा लाभ होणार आहे. सध्याच्या घडीला खासगी ठिकाणी सुरू असलेले आधार केंद्र चालकांना वाटेल त्या दिवशी सुरू असतात. आधार कार्ड सक्तीचे झाल्याने नागरिकांची आधार कार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू असते. मात्र, अनेक वेळा तालुकाभर हिंडूनदेखील आधार केंद्राची माहिती नागरिकांना मिळत नाही. पालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणत्या आधार केंद्राची निवड याकरिता करावी, याबाबत माहिती मागविली आहे. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत माहिती दिली जात नसल्याने पनवेलकरांना आधार केंद्र नेमके कधी सुरू होणार याबाबत प्रश्न पडला आहे.पालिका क्षेत्रात एकूण सहा आधार केंद्र सुरू होणार असल्याची माहिती रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळाली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील महाआॅनलाइन जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील यांच्याकडे आधार केंद्र सुरू करण्याची जाबाबदारी आहे. याबाबत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
शासकीय कार्यालयात आधार कार्ड केंद्रांचे स्थलांतर रखडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 1:49 AM