महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 11:49 PM2020-06-25T23:49:44+5:302020-06-25T23:49:58+5:30

वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.

Transfer of Commissioner canceled due to Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

महाविकास आघाडीमुळे आयुक्तांची बदली रद्द

googlenewsNext

- नामदेव मोरे

नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरल्यामुळे ४८ तासामध्ये मिसाळ पुन्हा महापालिकेत परतले आहेत. वाशीमध्ये उभारलेले १२०० बेडचे कोरोना रूग्णालय व कोरोना रोखण्यासाठी केलेल्या कामासह वैयक्तिक जनसंपर्क आयुक्तांच्या कामी आल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाने पाच हजारचा आकडा गाठल्यामुळे शासनाने आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची २३ जूनला तडका फडकी बदली केली. त्यांच्या जागेवर अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली होती. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये अपयश आल्यामुळे बदली केल्याची चर्चा नवी मुंबईमध्ये सुरू होती. मागील काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार गणेश नाईक यांनीही मिसाळ यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती. काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी व काही सामाजीक संस्थांनीही मिसाळ यांच्याविरोधात सोशल मिडीयावरून मिसाळ यांच्याविरोधात मोहीम सुरू केली होती. यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्याचे बोलले जात होते. परंतु बदली झाल्यानंतर दोन दिवस नवीन आयुक्तांनी पदभार स्विकारला नाही. या ४८ तासामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही बदली रद्द करावी असा आग्रह धरला होता. पालकमंत्र्यांनी बदलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही मिसाळ यांच्यासाठी आग्रह धरल्याचे बोलले जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेही त्यांच्या कामाविषयी समाधानी असल्याचे समजते.
नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मनपा आयुक्तांनी चार स्तरीय आरोग्य यंत्रणा कार्यान्वीत केली. प्रत्येक नागरी आरोग्य केंद्रामध्ये फ्लू क्लिनीक सुरू केले. वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये १२०० बेडचे रूग्णालय उभारण्यात आले आहे. या रूग्णालयाचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही कौतुक केले होते. नवी मुंबईमध्ये रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्केवर गेले होते. या सर्व कामामुळेही बदली रद्द होण्यास मदत झाल्याचे बोलले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतर आयुक्तांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी समन्वय उत्तम असल्याचा फायदा झाला आहे. गुरूवारी आयुक्तांनी पुन्हा महापालिकेत येऊन कामकाज करण्यास सुरवात केली असून दिवसभर याचीच चर्चा शहरात सुरू होती.
>बदली रद्द करण्यासाठी आग्रह
मनपा आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रद्द करण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानीक नेत्यांनीही प्रयत्न केले. मिसाळ यांचे काम चांगले असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत हा विषय पोहचविण्यात आला.
मिसाळ यांचेही महाविकास आघाडीसह भाजपच्या काही नेत्यांशीही चांगले संबध आहेत. मिसाळ यांच्या निवृत्तीला एक वर्ष राहिले असल्यामुळे व ते चांगले काम करत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे.
बदली झाली असती तर त्याचा राजकीय फायदा माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना झाला असता हेही महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
>सर्वांना विश्वासात घेऊन काम
आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्वांना विश्वासात घेऊन काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजीक संघटनांच्या मदतीने प्रतिदिन ३५ हजार नागरिकांना जेवण उपलब्ध करून दिले होते. प्रत्येकाचे म्हणने शांतपणे ऐकूण घेतात. कोरोनाची परिस्थिती संयमाने हाताळताना विनाकारण प्रसिद्धीचा हव्यास धरला नाही. त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे बदली रद्द करण्यात आल्याची चर्चाही आहे.

Web Title: Transfer of Commissioner canceled due to Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.