महापालिकेतील सहा अभियंत्यांची खांदेपालट
By योगेश पिंगळे | Published: May 16, 2023 04:40 PM2023-05-16T16:40:32+5:302023-05-16T16:41:00+5:30
एकाच विभागात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अभियंत्यांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेच्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील सुमारे सहा अभियंत्यांची खांदेपालट करण्यात आली असून काही अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी बदल्या केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
एकाच विभागात मागील काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही अभियंत्यांवर अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता संजय खताळ यांची महापालिका मुख्यालयातून कोपरखैरणे विभागात बदली करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता विजय राऊत यांच्याकडे पर्यावरण व क्षेपणभूमीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. नगररचना विभागातील उपअभियंता गजानन पुरी यांची बदली सार्वजनिक बांधकाम विभाग (मुख्यालय) येथे करण्यात आली आहे. बेलापूर विभागातील पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता दीपक नगराळे यांची बदली करून त्यांच्याकडे ठाणे बेलापूर रस्त्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून नेरुळ पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुरेश लगदिवे यांच्याकडे बेलापूर विभागाच्या पाणीपुरवठ्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
शाखा अभियंता सुभाष तुंगार यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणाहून बदली करून त्यांच्याकडे ठाणे बेलापूर रस्त्याची जबाबदारी देण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर व्हावे व पदभार स्वीकारल्याचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी दिले आहेत.