वाघिवली गावच्या स्थलांतरावर गंडांतर?, सिडकोचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 11:54 PM2020-01-06T23:54:22+5:302020-01-06T23:54:28+5:30
वाघिवली गावातील ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांमुळे सिडकोने या गावचे स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई : वाघिवली गावातील ग्रामस्थांच्या अवास्तव मागण्यांमुळे सिडकोने या गावचे स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे वाघिवली गावाचे स्थलांतर झाले नाही तरी विमानतळ प्रकल्पाला त्याचा फारसा अडथळा येणार नाही. त्यामुळेच सिडकोने हा निर्णय घेतल्याचे समजते.
मंजूर पुनर्वसन पॅकेजव्यतिरिक्त काही गावांतील प्रकल्पबाधित ग्रामस्थांकडून स्थलांतरासाठी अव्वाच्या सव्वा मागण्या केल्या जात असल्याने सिडकोची डोकेदुखी वाढली आहे. स्थलांतरित जागेत घराचे बांधकाम करण्यासाठी सिडकोने निश्चित केलेल्या पंधराशे रुपये प्रति चौ. फूट दराऐवजी अडीच हजार रुपये दर मिळावा यासारख्या असंख्य वाढीव मागण्या वाघिवली ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. विमानतळ प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सिडकोने वेळोवेळी ग्रामस्थांना झुकते माप दिले. मात्र आता त्यांच्या मागण्यांत वाढ झाल्याने त्या मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा सिडकोने घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून सिडको व्यवस्थापन आता वाघिवली गावाचे स्थलांतर न करण्याच्या मन:स्थितीत आल्याचे समजते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी दहा गावांचे स्थलांतर करण्यात येत आहे. त्यात वाघिवली गावाचादेखील समावेश आहे. हे गाव विमानतळाच्या गाभा क्षेत्रात मोडत नसले तरी ते गाभा क्षेत्राला लागूनच आहे. वाघिवली गावाच्या ठिकाणी सिडको कोणत्याही प्रकारचे बांधकाम करत नसली तरी त्या ठिकाणी सुरुवातीस मॅन्ग्रोव्ह पार्क बनविण्याचा निर्णय सिडकोने घेतला होता. मात्र आता सिडकोने मॅन्ग्रोव्ह पार्कची जागाही बदलली आहे. त्यामुळे वाघिवली गाव स्थलांतरित झाले किंवा नाही झाले तरी विमानतळ प्रकल्पाला बाधा पोहोचत नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
वाघिवली गावातील १५६ कुटुंबांपैकी आतापर्यंत जवळपास ९0 कुटुंबांनी सिडकोने पुनर्स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर केले आहे. मात्र अद्यापही सुमारे ६५ कुटुंबांनी सिडकोने दिलेल्या मुदतीत स्थलांतर केलेले नाही. उर्वरित कुटुंबांनी स्थलांतर करण्यासाठी सिडकोकडे पुनर्वसन व पुनर्स्थापन पॅकेजव्यतिरिक्त विविध अटी-शर्ती व मागण्या ठेवलेल्या आहेत. वारंवार विनंती करूनही वाघिवली गावातील उर्वरित कुटुंबे स्थलांतरासाठी अडून बसले आहेत. सर्व प्रकल्पबाधितांसाठी पुनर्वसन पॅकेज समान राहणार असल्याने त्यांच्या मागण्या मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सिडको व्यवस्थापनाकडून स्पष्ट केले आहे. सिडकोच्या या निर्णयामुळे वाघिवलीतील उर्वरित कुटुंबांना विमानतळ पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहावे लागणार आहे.
>विमानतळासाठी सिडकोने वेळोवेळी ग्रामस्थांना झुकते माप दिले. मात्र आता त्यांच्या मागण्यांत वाढ झाल्याने त्या मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही, असा पवित्रा
सिडकोने घेतला आहे. संपूर्ण गाव स्थलांतरित न झाल्यास वाघिवली गावात जाण्यासाठी सिडकोकडून पर्यायी रस्त्याचे नियोजन केले जात आहे. तसेच वाघिवली गावातून जी कुटुंबे स्थलांतरित झाली आहेत, त्या कुटुंबांचे योग्यरीत्या पुनर्वसन करण्यास सिडको कटिबद्ध असून त्यांना लवकरात लवकर पुनर्वसन पॅकेजनुसार भूखंडाचे वाटप केले जाणार असल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे.