- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे पोलीस निरीक्षकांच्या बदल्या लांबणीवर गेल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकाच्या जागेसाठी उत्सुक असलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान जून अखेरीस या बदल्यांना शासनाकडून हिरवा कंदील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सर्वसामान्यांप्रमाणेच पोलिसांना-देखील वेगवेगळ्या मार्गाने लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अधिकारी व कर्मचारी बंदोबस्ताच्या तणावात आहेत. तर काही पोलीस निरीक्षक तणावासह रखडलेल्या बदल्यांमुळे चिंतीत आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या दोन महिन्यांपूर्वी होणे अपेक्षित होते. परंतु त्यापूर्वीच कोरोनामुळे लॉकडाऊन जाहिर झाल्याने त्यांच्यावर बंदोबस्ताचे काम पडले. या कालावधीत बदल्या करू नयेत, असे शासनाने सूचित केले होते. त्यामुळे अनेकांची उत्कंठा शिगेला लागली आहे. त्यामध्ये हव्या असलेल्या पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक पदावर विराजमान होण्यास इच्छुक असलेल्यांचा अधिक समावेश आहे. त्यापैकी काहींनी वर्षभरापूर्वीच अशा पोलिस ठाण्यात बदली करून घेण्यात बाजी मारली आहे. यामुळे तिथल्या वरिष्ठ निरीक्षकाची बदली होताच आपल्यालाच संधी मिळेल असा त्यांचा तर्क आहे. तर यासाठी काहींनी आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांसोबत बोलणी केली असल्याची देखील चर्चा आहे. परंतु बदल्या रखडल्याने अनेकांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांवर आपला राग काढत असल्याचेही काही ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर थेट आयुक्तालयात पोच असल्याचा तोरा देखील काही अधिकाऱ्यांकडून मिरवला जात आहे. त्यामुळे सेवा ज्येष्ठता व रेकॉर्ड शीट वरील शेरा पाहूनच वरिष्ठ निरीक्षक निवडले जातील अशी अपेक्षा काही अधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाºयांना डावलून वशिलेबहाद्दरांना वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती देऊन हद्द बहाल करण्याचा पायंडा नवी मुंबई पोलीस दलात मागील काही आयुक्तांनी पाडला होता. त्याविरोधात अनेक अधिकाºयांनी आवाज देखील उठवला होता. त्याचीच पुनरावृत्ती होऊ नये अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. त्याकरिता बदलीस पात्र असलेल्या अधिकाºयांचे आयुक्तांच्या भूमिकेकडे डोळे लागले आहेत. परंतु अद्याप बदल्यांसाठी शासनाकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. परंतु जून अखेर पर्यंत त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमध्ये अडकल्या बदल्या; जूनअखेरीस कार्यवाहीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 12:38 AM