सहआयुक्तांसह तीन उपआयुक्तांच्या बदल्या

By admin | Published: April 29, 2017 01:45 AM2017-04-29T01:45:53+5:302017-04-29T01:45:53+5:30

राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबईच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Transfers of three Deputy Managers with Joint Commissioners | सहआयुक्तांसह तीन उपआयुक्तांच्या बदल्या

सहआयुक्तांसह तीन उपआयुक्तांच्या बदल्या

Next

नवी मुंबई : राज्य सरकारने जाहीर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नवी मुंबईच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात एक सहआयुक्त, तर तीन उपआयुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. त्यांच्याजागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्यापुढे शहरातील गुन्हेगारी नियंत्रित राहण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
राज्य सरकारने पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी रात्री जाहीर केले. त्यात भारतीय व राज्य सेवेतील विशेष महानिरीक्षक तसेच अधीक्षक दर्जाच्या एकूण १३७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदली झालेल्या या अधिकाऱ्यांमध्ये नवी मुंबईचे सहआयुक्त मधुकर पाण्डेय यांच्यासह चार उपआयुक्तांचा समावेश आहे. गुन्हे शाखा उपआयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ-एक उपआयुक्त प्रशांत खैरे व राज्य राखीव पोलीस बल गट ११चे उपआयुक्त राजीव जैन यांचा समावेश आहे. सहआयुक्त मधुकर पाण्डेय हे दहा महिन्यांपूर्वी नवी मुंबई आयुक्तालयात रुजू झाले होते. यापूर्वी अप्पर पोलीस आयुक्तपदाचा दर्जा त्यांच्या नियुक्ती वेळी सहआयुक्त असा करण्यात आला होता; परंतु सह आयुक्त पदावर नियुक्ती होऊनही तसे अधिकार मिळत नव्हते, अशी चर्चा आहे. यामुळे त्यांनी स्वत:हून बदलीसाठी प्रयत्न चालवले होते, अशीही चर्चा पोलिसांमध्ये आहे. अखेर त्यांची ठाणे शहर येथे सह आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई राज्य गुप्तवार्ताचे सह आयुक्त संतोष रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
मागील काही वर्षांपासून नवी मुंबईतली गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे काम उपआयुक्त दिलीप सावंत यांनी गुन्हे शाखेच्या माध्यमातून केले आहे. अमली पदार्थविक्रेते यांच्यासह आर्थिक फसवणुकीच्या अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पथकांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. यामुळे नियंत्रणात असलेली गुन्हेगारी कायम ठेवण्याचे तसेच केलेल्या कारवायांचा तपास पुढे सुरू ठेवण्याचे आव्हान गुन्हे शाखेच्या नव्या उपआयुक्तांपुढे असणार आहे. तर परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे यांनीही त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारांवर कायद्याचा दबदबा निर्माण करण्याचे काम केले आहे. या दोन्ही उपआयुक्तांच्या बदलीमुळे आयुक्तालयातील रिक्त झालेल्या दोन जागांकरिता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आर. आर. बनसोडे व मुंबईचे उपआयुक्त प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Transfers of three Deputy Managers with Joint Commissioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.