नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर तुर्भे येथे सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहेत. त्यानुसार सीबीडीकडून वाशीकडे येणाऱ्या वाहनांना एलपी येथून प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यायी तुर्भे एमआयडीसी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.सायन-पनवेल मार्गाच्या रुंदीकरण तसेच नव्या पुलांच्या उभारणीनंतरही सदर मार्गावरील वाहतूककोंडी सुटलेली नाही. प्रतिवर्षी पावसाळ्यात मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत, तर काही पुलांवर मोठमोठे खड्डे पडून त्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने सायन-पनवेल मार्गाच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जागोजागी काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत, त्यानुसार तुर्भे येथेही मोठ्या प्रमाणात काम केले जाणार आहे. या दरम्यान, कामात अडथळा होऊ नये अथवा वाहतूककोंडी होऊ नये, याकरिता सदर ठिकाणी प्रवेशबंदी करून एमआयडीसी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे. काँक्रिटीकरणाचे संपूर्ण काम होईपर्यंत वाहतुकीतील हा बदल राहणार आहे. मात्र, जीवनावश्यक वाहने, अग्निशमन दल व रुग्नवाहिका यांच्यासाठी बदल लागू राहणार नाही.दुरुस्तीच्या कामानिमित्त केलेल्या बदलानुसार एलपी येथून तुर्भेकडे येणा-या वाहनांना एमआडीसी मार्गे वळवण्यात आले आहे. तर उरण फाटा पुलापासून डाव्या अथवा उजव्या बाजूच्या सर्व्हिस रोडमार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. तर ठाणेकडून सीबीडीकडे जाणारी वाहने तुर्भे नाका येथून डावीकडून एमआयडीसी मार्गे एलपी पुलालगत बाहेर काढली जाणार आहेत. मुंबई-पुणे जाण्यासाठी सायन-पनवेल मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने सकाळ, संध्याकाळ मोठी रहदारी असते. अशातच दुरुस्तीच्या कामामुळे केलेल्या वाहतुकीच्या या बदलामुळे प्रवासाचे अंतर वाढून प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तर वाहतूक पोलिसांवरही कामाचा ताण वाढणार आहे.
सायन-पनवेल मार्गाच्या दुरुस्तीसाठी वाहतुकीत बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:27 PM