महामार्गाच्या हस्तांतरणाचा तिढा; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 03:18 AM2018-09-02T03:18:39+5:302018-09-02T03:18:48+5:30

सायन-पनवेल महामार्गावरून दरदिवशी दोन ते अडीच लाख वाहने जा-ये करतात. सुमारे १३00 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सायन-पनवेल महामार्ग अल्पावधीतच नादुरुस्त झाला आहे.

 Transit of highway transit; There is no response from the Public Works Department | महामार्गाच्या हस्तांतरणाचा तिढा; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद नाही

महामार्गाच्या हस्तांतरणाचा तिढा; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रतिसाद नाही

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरून दरदिवशी दोन ते अडीच लाख वाहने जा-ये करतात. सुमारे १३00 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या सायन-पनवेल महामार्ग अल्पावधीतच नादुरुस्त झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याची देखभाल करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमीचा महामार्ग हस्तांतरित करावा, असा प्रस्ताव महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. परंतु संबंधित विभागाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने हस्तांतरणाचा तिढा वाढला आहे.
सायन-पनवेल महामार्गाचा सुमारे ९ किमी लांबीचा रस्ता महापालिका कार्यक्षेत्रात मोडतो. महापालिका आपल्या अखत्यारित असलेल्या मुख्य व अंतर्गत रस्त्यांची नियमित डागडुजी करते. परंतु महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने महापालिकेला या रस्त्याची डागडुजी करणे शक्य होत नाही. सध्या या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. विशेषत: महामार्गावरील उड्डाणपूल तर प्रवासासाठी धोकादायक बनले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. महामार्गावरील वाहतूककोंडीचा परिणाम शहरातील दैनंदिन कारभारावर होत आहे. सायन-पनवेल महामार्गामुळे दोन भागात शहराचे विभाजन झाले आहे. त्यामुळे महामार्गावर कोंडी झाल्यास संपूर्ण शहरात वाहनांचा चक्काजाम होतो. विशेष म्हणजे वारंवार विनंती करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची डागडुजी केली जात नाही. अनेकदा थातुरमातुर दुरुस्ती करून वाहनधारकांची बोळवण केली जाते. यावर उपाय म्हणून वाशी ते सीबीडी दरम्यानचा महामार्गाचा ९ किमी लांबीचा पट्टा वर्ग करावा, असे महापालिकेचे प्रयत्न आहेत. त्यासंबंधीचा प्रस्ताव यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अलीकडेच सामाजिक संस्थांच्या शिष्टमंडळांशी बोलताना दिली आहे. हा रस्ता हस्तांतरित झाल्यास त्याची नियमित डागडुजी करणे शक्य होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचा नाईलाज झाला आहे.

गणेशभक्तांना चिंता
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. परंतु सायन-पनवेल महामार्गावरील खड्डे जैसे थे आहेत. शहरातील अन्य प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्तेही खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे गणेशभक्तांच्या चिंतेत वाढ झाली आहे. रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना केव्हा सुरुवात होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Web Title:  Transit of highway transit; There is no response from the Public Works Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.